सेनवर भारी पडला अॅक्सलसेन
पुरुष बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेन पराभूत : आता कांस्यपदकासाठी खेळणार
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला शनिवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात डेन्मार्कच्या दिग्गज व्हिक्टर अॅक्सलसेनकडून पराभवाचा सामना करावा लागला. लक्ष्यने संपूर्ण सामन्यात शानदार खेळ केला पण छोट्या छोट्या चुका त्याला महागात पडल्या. अॅक्सलसेनने लक्ष्यवर 22-20, 21-14 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. आता, लक्ष्य कांस्यपदकासाठी लढत देणार आहे. 5 ऑगस्ट रोजी लक्ष्यचा सामना मलेशियाच्या ली झिया जीशी होईल.
पुरुष एकेरी बॅडमिंटनच्या सेमीफायनलचा सामना शनिवारी भारताचा लक्ष्य सेन व डेन्मार्कचा व्हिक्टर अॅक्सलसेन यांच्यात झाला. सामन्याच्या पहिल्या गेममध्ये लक्ष्यने अफलातून खेळ साकारताना अॅक्सलसेनवर वर्चस्व गाजवले. दोघेही एकवेळ 9-9 अशा बरोबरीत होते. यानंतर लक्ष्यने जबरदस्त खेळ साकारताना 9 गुणाची कमाई करत आपली आघाडी 18-9 अशी केली. यानंतर लक्ष्य खेळताना थोडासा अडचणीत आला व याचा फायदा अॅक्सलसेनने घेतला. अॅक्सलसेनने शानदार पुनरागमन करत स्कोअर 19-17 असा केला. शेवटच्या क्षणांत व्हिक्टर आणि लक्ष्य यांच्यात निकराची लढत झाली आणि पहिल्या सेटमध्ये स्कोअर 20-20 पर्यंत पोहोचला. मात्र, शेवटी व्हिक्टरने पहिला गेम 22-20 असा जिंकला.
व्हिक्टरविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये जोरदार कमबॅक केले. पहिल्या काही मिनिटात लक्ष्यने 7-0 अशी आघाडी घेतली. पण काही वेळातच सामना पलटला. लक्ष्यने काही चुका केल्या, ज्यामुळे व्हिक्टरला पुनरागमनाची संधी मिळाली. ब्रेकपर्यंत लक्ष्य सेन 11-10 ने आघाडीवर होता. ब्रेकनंतर व्हिक्टरने पुनरागमन करत स्कोर 11-11 आणला. व्हिक्टर इथेच थांबला नाही आणि आपली आघाडी वाढवत राहिला. त्याने लक्ष्यला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही आणि दुसरा गेम 21-14 असा जिंकला. यासह व्हिक्टरने फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. आता, सुवर्णपदकासाठी व्हिक्टर व थायलंडचा कुनलावत यांच्यात तर कांस्यपदकासाठी भारताचा लक्ष्य सेन व मलेशियाचा ली झिया यांच्यात लढत होईल.
संपूर्ण सामन्यात लक्ष्य सेनने सुरेख खेळ केला. त्याच्याविरुद्ध खेळताना माझ्याकडून अनेक चुका झाल्या. पुढील ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा प्रबळ दावेदार लक्ष्य सेन असेल.
डेन्मार्कचा अव्वल मानांकित बॅडमिंटनपटू व्हिक्टर अॅक्सलसेन.
माजी सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिन मारीनला रडत सोडावे लागले मैदान
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिटंनचा उपांत्य सामना स्पेनची कॅरोलिन मारीन व चीनची ही बिंगजाओ यांच्यात झाला. या सामन्यात मारीनने पहिला गेम 21-14 असा जिंकला व दुसऱ्या गेममध्ये ती 10-8 अशी आघाडीवर होती. मात्र या दरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती कोर्टवर पडली. यानंतर ती वेदनेमुळे कोर्टवर रडताना दिसली. मेडिकल टीमने तपासले पण दुखापत गंभीर असल्यामुळे तिला सामन्याबाहेर जावे लागले. सामना अर्धवट सोडावा लागल्याच्या दु:खाने तिला रडू आवरता आले नाही. मारीनने सामना अर्धवट सोडल्यामुळे चीनची ही बिंगजाओ अंतिम फेरीत पोहोचली.