शेतात खुर्ची उगवणारा अवलिया
7 वर्षांपूर्वी द्यावी लागते ऑर्डर
हे जग अजब गोष्टी आणि लोकांनी भरलेले आहे. आज एका अशाच अनोख्या व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे. हा इसम खुर्ची तयार करण्याऐवजी उगविण्याचे काम करतो. या कामात त्याला भरपूर वेळ आणि मेहनत करावी लागते, परंतु या कामातील नफा ऐकून तुम्ही चकित व्हाल. सर्वसाधारणपणे तुम्ही शेतांमध्ये शेतकऱ्यांना फळभाज्याचे पिक घेताना पाहिले असेल. परंतु एक इसम शेतात फर्निचरचे पीकच घेतो. त्याने उगविलेल्या खुर्च्यांना मोठी मागणी असली तरीही त्याची किंमत देणे सर्वांना शक्य नाही. या इसमाचे नाव गॅविन मुन्रो असून तो इंग्लंडच्या डर्बीशायर डील्स येथील रहिवासी आहे. या व्यक्तीची कला म्हणजे ज्या खुर्च्यांना लाकूड कापून तयार केले जाते, तो या खुर्च्यांना थेट झाडावरच उगवितो आणि फळांप्रमाणे त्यांना तोडतो. याकरता तो विलो नावाच्या वृक्षाचा वापर करतो. याच्या फांद्या अत्यंत लवचिक असतात. अशाचप्रकारे ओक, ऐश आणि सिकामोर यासारख्या मजबूत लाकूड असलेल्या वृक्षाचा वापर ते फर्निचर उगविण्यासाठी करतात. झाडांच्या फांद्यांना खुर्च्यांचा आकार देण्यासाठी गॅविन लोखंडी फ्रेमचा वापर करतात आणि आत लाकडी खुर्ची फिट करून उगविली जाते. दर 5 वर्षांनी वृक्षाची तोड होती, जेणेकरून खुर्च्यांचा शेप बिघडू नये.
गॅविन यांच्या या कामामध्ये त्यांची पत्नी एलिस देखील मदत करते. जर कुणाला खुर्ची खरेदी करायची असल्यास त्याला किमान 7 वर्षांपूर्वी ऑर्डर द्यावी लागते. यानंतर खुर्ची प्राप्त होऊ शकते. याप्रकारच्या एका खुर्चीची किंमत 6-7 लाख रुपये इतकी आहे. अधिक वेळ आणि मेहनत लागत असल्याने याची किंमत अधिक असल्याचे गॅविन यांचे सांगणे आहे.