गजब कथा...
देवांचा निरोप सगळ्यांनाच मिळाला होता. वेली जशा जाऊन आल्या, तसे अतिउंच झाडांना मात्र काय करावे सुचेना. त्यांनी देवाला निरोप पाठवला, आम्हाला इतका उंच करून ठेवले आहेस की धड वरती येता येत नाही आणि जमिनीवर जाता येत नाही. आमच्या जवळ कोणी पक्षी प्राणी खेळायला येत नाही. आमची पानं इतकी लहान आहेत की त्याच्या सावलीखाली कोणी बसायला येत नाही. आम्हाला खूप राग आलाय आता. त्यामुळे आम्ही काही आता वर येऊ शकत नाही. आमची एवढीच उंची वाढू शकते. देवांच्या लक्षात आलं त्यांची काय अडचण आहे ते. देवाने त्यांना सांगितलं, उद्या सकाळपर्यंत वाट बघा, तुम्हाला मी काहीतरी वेगळं देणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी या झाडांच्या झावळ्यांच्या सुरुवातीला मोठे मोठे मोहोर, घोस लोंबायला लागले. त्या प्रत्येकाला गोल गोल आकारांच्या छोट्या छोट्या माळा लागल्या होत्या. सगळ्या झाडांना खूप आनंद झाला. त्या मोहराच्या वासाने छोटे छोटे कीटकही आकर्षित होऊ लागले. काही पक्षी आनंदाने येऊन बसले. हा मोहर फुलल्यानंतर त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोल आकाराची फळं तिथे लागली. त्या फळांमध्ये देवाने अमृताची गोडी असलेलं पाणी जपून ठेवलं होतं. कारण समुद्राजवळ वाढणारे हे नारळी पोफळीचे झाड समुद्राचे पाणी काही पिऊ शकत नव्हते. अशावेळी लोकांना अडीअडचणीला उपयोगी येईल असं ते जादुई पाणी ह्या छोट्या छोट्या फळांमध्ये ठेवलं. त्यांना लागलेली फळं पाहून आता माणसंही आकर्षित होऊ लागली. एवढ्या उंचीवर काय बरं असेल या फळांमध्ये? असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. त्यातलं एक फळ माणसाने चाखलं आणि आता तो आवर्जून या झाडाची लागवड आपल्या अंगणात, शेतात जवळपास सर्वत्र करू लागला. वर्षानुवर्ष टिकणारं हे झाड त्याला खूप आपलं वाटू लागलं. या झाडाची झावळी खाली पडल्यानंतर, सुकल्यानंतर त्याच्यापासून झाडू बनवू लागला. नारळाच्या प्रत्येक भागापासून काही ना काही तरी बनवायचं कौशल्य त्याच्याकडे आलं. आणि नारळाला कल्पवृक्षाचा मान मिळाला. आता नारळाला खूप आनंद होऊ लागला होता. आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडतो हा आनंद फार मोठा त्याला आता मिळू लागला होता. त्याच्यासारखीच परिस्थिती खजूर, माड, पोफळी, सुपारी या सगळ्या झाडांची झाली होती. प्रत्येक जण काही ना काही माणसाच्या पदरात टाकतच होता. असे हे परोपकारी वृक्ष देवाच्या आशीर्वादामुळे आनंदाने जगू लागले होते.