काळा दिन सायकल फेरीसाठी समाजमाध्यमांवर जागृती
बेळगाव : काळा दिनाची सायकल फेरी शनिवार दि. 1 नोव्हेंबर रोजी काढली जाणार आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो सायकलफेरी काढणारच, असा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकाधिक जागृती केली जात आहे. गावोगावी, गल्लोगल्ली बैठका घेण्यासोबतच समाजमाध्यमांवर स्टेटस ठेवून याबाबतची जागृती केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ अशा आशयाच्या एका संदेशातून समाजमाध्यमांवर जागृती करण्यात येत आहे. उष:काल होण्यासाठी आता प्रत्येकाला मशाली पेटवाव्या लागतील, त्यामुळे 1 नोव्हेंबर रोजी काळा दिनाच्या सायकल फेरीमध्ये शेकडोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने ‘माझी मैना गावाकडं राहिली’ अशा आशयाचा संदेश तयार करून बेळगावसह सीमाभागातील मराठी माणसाची व्यथा मांडण्यात आली आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी येथील मराठी भाषिकांना सोसावा लागणारा अन्याय या माध्यमातून प्रकर्षाने मांडण्यात आला आहे. जागृतीसाठी अवघे दोन दिवस राहिल्याने समाजमाध्यमांवर व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवले जात आहेत. त्याचबरोबर मराठी भाषिक व म. ए. समितीशी संबंधित व्हॉट्सअप ग्रुपवर अधिकाधिक जागृती केली जात आहे. त्याचबरोबर विभागवार म. ए. समितीच्या बैठका घेतल्या जात आहेत.