हेल्मेट वापरासाठीच्या जागृती मोहिमेला गती
चौकाचौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून अभियान : मोहिमेत सातत्य ठेवल्यामुळे अधिकाऱ्यांचे कौतुक
बेळगाव : प्रोजेक्ट हेल्मेटअंतर्गत बेळगाव शहर व उपनगरात जागृतीची मोहीम सुरू आहे. गुरुवारी प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्या हातात हेल्मेटच्या जागृतीसंबंधी फलक दिले. ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी दुपारी जुन्या पी. बी. रोडवरील बी. एस. येडियुराप्पा मार्गावर मोटारसायकल दुभाजकाला आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याने हेल्मेट परिधान केले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. अशा अनेक अपघातात हेल्मेटशिवाय अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळेच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी हेल्मेटसक्तीविषयी जागृती वाढवली आहे.
वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी आदी अधिकाऱ्यांनी बुधवारी कित्तूर चन्नम्मा सर्कल, गोगटे सर्कल व शहापूर येथील बँक ऑफ इंडिया सर्कल परिसरात जागृतीची मोहीम राबविली. जे मोटारसायकलस्वार हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालवतात, त्यांना अडवून त्यांच्या हातात जागृतीचे फलक देण्यात येत आहेत. ‘हेल्मेट परिधान करा, जीव वाचवा’ असे ते फलक आहेत. सकाळी हेल्मेटसंबंधी जागृती व संध्याकाळी बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्याचे काम वाहतूक पोलिसांनी हाती घेतले आहे. गेल्या पंधरवड्यात वाहतूक पोलिसांच्या मोहिमेने जोर घेतला असून जागृती व मोहिमेत सातत्य ठेवल्यामुळे या अधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.