‘स्वच्छता ही सेवा’अंतर्गत बस्तवाडमध्ये जागृती
कचरावाहू वाहनाचे उद्घाटन : कचऱ्याविना सण-उत्सव साजरे करण्याला प्रोत्साहन देणार
बेळगाव : यंदाही ‘स्वच्छता ही सेवा कार्यक्रम’ संपूर्ण जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची उचल करून जागेची स्वच्छता करणे, सार्वजनिक जागांची स्वच्छता, सफाई कामगारांसाठी सुरक्षा शिबिर, कचऱ्याविना सण-उत्सव साजरे करण्याला प्रोत्साहन देणे, नैसर्गिक आपत्ती भागात स्वच्छता उपक्रम राबविणे, रोपे लागवड यासारखे कार्यक्रम ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात येत असल्याची माहिती जि. पं. योजना संचालक रवी बंगारेप्पनवर यांनी दिली. ‘स्वच्छता ही सेवा’ कार्यक्रमांतर्गत बस्तवाड (ता. बेळगाव) ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कचरावाहू वाहनाचे उद्घाटन तसेच ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या घोषवाक्याद्वारे हाती घेण्यात आलेल्या सामूदायिक श्रमदान कार्यक्रमात बंगारेप्पनवर बोलत होते. या कार्यक्रमानंतर बस्तवाड ग्राम पंचायत आवारात स्वच्छता, सुवर्णसौध आवारातील सायन्स पार्कमध्ये श्रमदानाने रोपे लावण्यात आली.
राष्ट्रीय जीवनउपाय अभियानांतर्गत अमलीपदार्थमुक्त कर्नाटकसाठी
ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कार्यक्रम झाला. त्यानंतर स्वच्छता ही सेवा व अमलीपदार्थमुक्त कर्नाटक संदर्भात गावातून जागृती करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी गिरीष इटगी, ता. पं. चे कार्यकारी अधिकारी प्रशांत सावंत, साहाय्यक संचालक बसवंत कडेमनी, ग्रा. पं. अध्यक्षा शिल्पा पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर, ग्राम पंचायत विकास अधिकारी हणमंत पोळ, जिल्हा पंचायतीच्या एसबीएम योजनेचे जिल्हा समालोचक, एनआरएलएम योजनेचे कर्मचारी, तालुका पंचायतीचे कर्मचारी, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.