काळ्यादिनी हरताळ पाळण्यासाठी नंदगड येथे जनजागृती
वार्ताहर/नंदगड
1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषांवार प्रांतरचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला आहे. गेल्या 68 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून निषेध व्यक्त करतात. येत्या शनिवार दि. 1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समिती पदाधिकाऱ्यांच्यावतीने बुधवारी नंदगड येथे करण्यात आले.
यावेळी नंदगड बस स्थानक तसेच बाजारपेठेत जागृती फेरी काढून घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप करून, मराठी भाषिकांमध्ये जागृती करण्यात आली. शनिवारी काळ्यादिनानिमित्त खानापूर येथील शिवस्मारकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले. तसेच नंदगडसह परिसरातील गावांमध्ये ही जनजागृती करण्यात आली
या जागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, समितीचे नेते मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, प्रवीण पाटील, मोहन गुरव, ब्रह्मानंद पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, राजाराम देसाई, डी. एम. भोसले, विठ्ठल गुरव, ज्ञानेश्वर गुरव, ज्ञानेश्वर बिडकर आदीसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.