ऑस्ट्रेलिया महिला संघाचे मॅकग्राकडे नेतृत्व
वृत्तसंस्था/ सिडनी
अनुभवी अष्टपैलू ताहलिया मॅकग्रा हिची भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी 13 सदस्यीय संघाची घोषणा केली. नियमित कर्णधार अॅलीसा हिली जखमी असल्याने तिच्या जागी मॅकग्राची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
34 वर्षीय हिलीला गुडघ्याच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने तिला बिग बॅशच्या अखेरच्या टप्प्यात अनफिट ठरविण्यात आले. त्यामुळेच तिला भारताविरुद्धच्या मालिकेलाही मुकावे लागत आहे. भारत- ऑस्ट्रेलिया महिलांची मालिका 5 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमधील सामन्याने होणार आहे. या मालिकेतील दुसरा व तिसरा वनडे सामना 8 व 11 डिसेंबर रोजी ब्रिस्बेन व पर्थ येथे होतील. आघाडीची युवा फलंदाज जॉर्जिया व्हॉलने या मोसमात चांगली कामगिरी केल्याने तिला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघात निवडण्यात आले. या मालिकेनंतर टी-20 वर्ल्ड चॅम्पियन्स न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाची तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. 19 ते 23 डिसेंबर या कालावधीत ही मालिका वेलिंग्टनमध्ये खेळविली जाणार आहे.
या दोन मालिकांतील सहाही सामने आयसीसी महिला चॅम्पियनशिप अंतर्गत होणार आहेत. सध्या ऑस्ट्रेलियन महिला संघ अग्रस्थानी आहे. या दोन मालिकांसाठी आम्ही अनुभवी खेळाडूंचा संघ आगामी अॅशेस मालिका व आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेवर नजर ठेवून निवडला आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे परफॉर्मन्स हेड व राष्ट्रीय निवड सदस्य शॉन फ्लेग्लर यांनी सांगितले.
भारताविरुद्ध निवडलेला ऑस्ट्रेलियन महिला वनडे संघ : डार्सी ब्राऊन, अॅश्ले गार्डनर, किम गर्थ, अॅलाना किंग, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार) सोफी मॉलिन्यू, बेथ मूनी, एलीस पेरी, मेगन स्कट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया व्होली, जॉर्जिया वेअरहॅम. न्यूझीलंड मालिकेसाठी अॅलीसा हिली.