मंगाईदेवी यात्रेत प्राणीदयेबाबत जागृती
दयानंद स्वामी यांनी मानले भाविकांचे आभार
बेळगाव : देवदेवतांच्या नावाने पशु व प्राणी बळी देणे हा कायद्याने गुन्हा आहे. न्यायालयानेसुद्धा त्याबाबत निर्बंध घातले आहेत. कोणतेही देवदेवता मनुष्याच्या भक्तिभावाने संतुष्ट होतात. हिंसेने नव्हे तर अहिंसेने देवाची पूजा करायला हवी. त्यामुळे मंगाई देवी यात्रेमध्ये पशु व प्राणी बळी न देता भाविकांनीसुद्धा सहकार्य पेल्याबद्दल दयानंद स्वामी यांनी धन्यवाद दिले आहेत. स्वामी दयानंद हे विश्व प्राणी कल्याण मंडळ, पशु प्राणी निर्मूलन, जागृती महासंघ व बसव धर्म ज्ञानपीठाचे प्रमुख आहेत. पशु प्राणी बळी रोखण्यासाठी त्यांनी राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. पशु प्राणी बळी देणे ही अंद्धश्रदा आहे. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले होते.
यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला होता. स्वामींनी निवेदन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनाही दिले होते. प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन यात्रेच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता. दयानंद स्वामी स्वत: मंगाई यात्रेच्या ठिकाणी सकाळपासून थांबून होते. त्यांनी सातत्याने देवदेवतांच्या नावाने प्राणी व पशु बळी देणे हा कायद्याने गुन्हा असून देवालये ही अहिंसा, करुणा व मानवता जपणारी केंद्रे व्हावीत, असे सांगून जनजागृती केली. भाविकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. याप्रसंगी उचगाव येथे मळेकरणीवेळी प्राणी व पशुबळी प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, लक्ष्मण चौगुले उपस्थित होते.