एड्सबाबत समाजात जागरुकता गरजेची
न्यायाधीश संदीप पाटील यांचे प्रतिपादन : बिम्समध्ये एड्सदिनानिमित्त कार्यक्रम
बेळगाव : एड्सबाबत नागरिक जागरुक असले तरी बेजबाबदारपणामुळे एड्स हा जीवघेणा आजार नियंत्रणात येत नाही ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे समाजात आणखी जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संदीप पाटील यांनी व्यक्त केले.जिल्हा सेवा प्राधिकारण, अलायन्स क्लब, स्मार्ट सिटी क्लब आणि बिम्स यांच्या संयुक्त विद्यमाने बिम्सच्या सभागृहात सोमवार दि. 1 रोजी जागतिक एड्सदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर न्यायाधीश संदीप पाटील म्हणाले, सर्वांनी आपल्या सभोवतालचे पर्यावरण जपले पाहिजे.
चांगला व नैसर्गिक आहार स्वीकारून समाजाला समृद्ध करणाऱ्या नैतिकता पूरक अशा उपक्रमामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मौल्यवान अशा शरीराचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्र,सहकार आणि सामाजिक संस्था एड्ससारख्या जीवघेण्या आजारावर नियंत्रण यावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये यशस्वी होण्यासाठी नागरिकांनी वाईट सवयींपासून दूर रहावे, जबाबदारी आणि काळजीपूर्वक सुंदर जीवन जगावे, असे ते म्हणाले. केएलई इन्स्टिट्यूटचे डॉ. राजीव नाईक, बिम्स मेडिसीन विभागाच्या डॉ. शोभा करकट्टी यांनीदेखील मार्गदर्शन केले. अलायन्स क्लबचे संचालक, अधिवक्ता दिनकर शेट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य, अधिवक्ता रविंद्र तोटागेरा यांनी आभार मानले.