लाभार्थ्यांना घरांचे हक्कपत्र हस्तांतर करण्यास टाळाटाळ
दांडेली तालुका सर्वांगीण विकास आंदोलन समिती-ग्रामस्थांकडून नगरपंचायत प्रशासनाचे अधिकारी धारेवर
वार्ताहर /दांडेली
कर्नाटक गृहमंडळाने 108 घरे बांधून पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दांडेलीनगर पालिकेस हस्तांतर केले आहे. पण दांडेली नगरप्रशासन लाभार्थ्यांना याची साधी माहिती देणे, लाभार्थ्यांना घरांचे हक्कपत्र हस्तांतर करण्यास चालढकल करत असल्यामुळे याच्या विरोधात दांडेली तालुका सर्वांगीण विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष आक्रम खान, पदाधिकारी व लाभार्थ्यांनी आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला व लाभार्थ्यांवर गेल्या सहा-सात वर्षापासून तीव्र अन्याय होत असल्याचा रोष व्यक्त करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कर्नाटक राज्य गृहमंडळ यांच्यावतीने आंबेवाडी भागात 1200 जी प्लस 2 घरे बांधत आहे. यातील 108 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या घरांचे आवश्यक प्रमाणपत्र कर्नाटक राज्य गृहमंडळाच्या सहाय्यक कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात नगरपालिकेस भेट देऊन संबंधीत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले होते. पण आता संबंधीत अधिकाऱ्यांनी कागदपत्रे कुठे ठेवली आहेत, हे माहित नाही. याबाबत नगरपालिकेचे अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. लाभार्थ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. यामुळे संतप्त लाभार्थ्यांनी दांडेली तालुका सर्वांगीण विकास आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली नगर आयुक्तांना जाब विचारला.
नगरायुक्त यांच्याबरोबर 108 जी प्लस 2 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. ही घरे लाभार्थ्यांना देण्यास नगरप्रशासन का टाळत आहे, असा प्रश्न समितीचे अध्यक्ष अक्रम खान यांनी उपस्थित करत इतर आश्रयघरे मंजूर झाले आहेत. त्या लाभार्थ्यांनासुध्दा न्याय दिला जात नाही. सध्या 108 जी प्लस 2 घरे पूर्ण बांधून सज्ज झाली आहेत. या घरांचे सर्व प्रमाणपत्र गृहमंडळाने दिले असताना लाभार्थ्यांना का हस्तांतर करत नाही? वेळकाढू धोरण अधिकारी वर्ग करत आहे. याचा त्रास व अन्याय मात्र लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. पूर्ण झालेल्या घरांचे हस्तांतर लवकरात लवकर करावे, अशी जोरदार मागणी आंदोलन समितीचे अध्यक्ष आक्रम खान यांनी सभेत केले.
नगर प्रशासनाचा सावळा गोंधळ
शहरातील लाभार्थ्यांनी आश्रयघरे मिळावेत म्हणून अर्ज केले आहे. याबाबत लाभार्थ्यांनी विचारणा केली असता तुमचे अर्ज व प्रमाणपत्र मिळत नाही. तुम्हाला दिलेले स्वीकृती अर्ज घेऊन यावे, असे उडवाउडवीचे उत्तरे देऊन संबंधीत अधिकारी असभ्य वर्तन करत आहेत. तसेच जी प्लस 2 च्या लाभार्थ्यांनासुध्दा पळवापळवी करावी लागत आहे. सर्व कागदपत्रे लाभार्थ्यांकडून घेतले असतानासुध्दा अधिकारी वर्ग नाहक त्रास लाभार्थ्यांना देत आहेत. याबाबत आंदोलन समितीनेसुध्दा संबंधीत अधिकारी यांना फैलावर घेत नागरिकांना व्यवस्थित माहिती देण्याचे काम करावे, अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला. यावेळी सादिक मुल्ला, शाम बेंगळूर, निला वाद, दत्तात्रय हेगडे, फारूख शेख, खाविजा पिरजादे व इतर लाभार्थी उपस्थित होते.