कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अविनाश, ज्योतीची ‘सुवर्ण’धाव

06:00 AM May 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

3000 मी स्टीपलचेस मध्ये 36 वर्षानंतर सुवर्ण : 100 मी अडथळ्याच्या शर्यतीत ज्योतीची बाजी,4×400 मी. रिलेत महिला संघाची सुवर्णमय कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/गोमी, दक्षिण कोरिया

Advertisement

आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंचा दबदबा पहायला मिळाला. महाराष्ट्राचा अविनाश साबळे 3000 मी स्टीपलचेस प्रकारात तर 100 मी अडथळ्याच्या शर्यतीत ज्योती याराजीने सुवर्णपदक मिळवले. यासह भारताचे या स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक ठरले आहे. पदकतालिकेत एकूण 14 पदकासह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. बीड जिह्यातील अविनाशने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने अंतिम फेरीत 8:20.92 सेकंदाची वेळ नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. अविनाशने अंतिम शर्यतीत जपानच्या युतारो निनाए आणि कतारच्या झकारिया एलाहलामी यांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला.

जपानच्या युतारोने 8:24.41 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक तर कतारच्या झकारियाने 8:27.12 सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे, अविनाशने यापूर्वी 2019 मध्ये आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. तो या स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 1975 साली हरबल सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 1989 मध्ये दिना राम यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. दिना राम यांच्यानंतर तब्बल 36 वर्षानंतर भारताला या प्रकारात सुवर्णपदक मिळाले आहे. दुसरीकडे, महिलांच्या 10 हजार मी शर्यतीत भारताच्या संजीवनी जाधवला निराशा पत्करावी लागली. तिने 33 मिनिटे 8.17 सेकंदाची वेळ नोंदवत पाचवे स्थान पटकावले. या प्रकारात कझाकिस्तानच्या डेजी जेपकेमीने सुवर्णपदक जिंकले.

100 मी अडथळ्याच्या शर्यतीत ज्योतीला सुवर्ण

महिलांच्या 100 मी अडथळ्याच्या शर्यतीत भारताच्या ज्योती याराजीने 12.96 सेकंदांची वेळ नोंदवत स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने सर्वोत्तम कामगिरी करताना कझाकिस्तानच्या ओल्गा शिशिगानाचा (13.04 सें) विक्रम मागे टाकला. दरम्यान जपानच्या योमी तनाकाला रौप्य तर चीनच्या वू यानीला कांस्यपदक मिळाले.

महिलांच्या 4×400 मी.मिश्र रिलेत 12 वर्षानंतर सुवर्ण

भारताच्या 4×400 मीटर मिश्र रिले संघाने सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. या प्रकारात रूपल चौधरी, संतोष कुमार, विशाल टीके आणि शुभा वेंकटेशन या भारतीय चमूने 3 मिनिटे आणि 18.12 सेकंदांच्या वेळेसह अव्वल स्थान पटकावले. यापैकी, रुपलने आदल्या दिवशी वैयक्तिक महिलांच्या 400 मीटर शर्यतीतही रौप्य पदक जिंकले होते. चिनी संघाने 3 मिनिटे 20 सेकंदांसह रौप्यपदक तर श्रीलंकेने 3 मिनिटे 21.95 सेकंदांसह कांस्यपदक जिंकले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article