कारवार लोकसभा मतदारसंघात सरासरी 76.53 टक्के मतदानाची नेंद
सर्वाधिक सिरशीतील शिरगुणी केंद्रात 94.38 टक्के : सर्वात कमी हल्याळ शाळेत 47.5 टक्के
कारवार : कारवार जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार कारवार लोकसभा मतदारसंघात सरासरी 76.53 टक्के मतदानाची नेंद झाली आहे. कारवार लोकसभा मतदारसंघात मंगळवारी शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीत 2.37 टक्के इतकी वाढ झाली आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 74.16 टक्के इतकी मतदानाची नोंद झाली होती. सिरशी विधानसभा मतदारसंघातील शिरगुणी सरकारी लोअर प्राथमिक शाळेतील (क्र. 22) मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. या मतदान केंद्रावर 94.38 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सर्वात कमी मतदानाची नोंद हल्याळ विधानसभा मतदारसंघातील महात्मा गांधी सेंच्युरी मेमोरीयल कन्या विद्यालयामधील मतदान केंद्रावर (167) झाली आहे. या मतदान केंद्रात 47.5 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदारसंघातील एकूण 16 लाख 41 हजार 156 मतदारांपैकी 12 लाख 56 हजार 27 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6 लाख 33 हजार 360 पुरूष (8,23,604 पैकी), 6 लाख 22 हजार 392 महिला (8,17,536पैकी) आणि 5 अन्य (16 पैकी) मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी सिरशी मतदारसंघात सर्वात अधिक मतदानाची नेंद झाली आहे. या मतदारसंघात 80.41 टक्के मतदानाची नेंद झाली आहे. सिरशी मतदारसंघातील 204898 मतदारांपैकी 164905 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या 83871 (102459 पैकी) आणि महिला मतदारांची संख्या 81124 (102438 पैकी) इतकी आहे.
सर्वात कमी मतदान कारवार विधानसभा मतदारसंघात
सर्वात कमी मतदानाची नोंद कारवार विधानसभा मतदारसंघात झाली आहे. या मतदारसंघात 73.63 टक्के मतदानाची नेंद झाली आहे. कारवार मतदारसंघातील एकूण 224894 मतदारांपैकी (110559 पुरूष, 114335 महिला) 165599 मतदारांनी (91917 पुरूष व 83682 महिला) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.85 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघातील 219442 मतदारांपैकी 162065 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कित्तूर विधानसभा मतदारसंघात 76.27 टक्के मतदानाची नेंद झाली आहे. या मतदारसंघातील एकूण दोन लाख 301 मतदारांपैकी 1 लाख 52 हजार 772 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हल्याळ विधानसभा मतदारसंघात 75.91 टक्के मतदानाची नेंद झाली आहे. या मतदारसंघातील एकूण 1 लाख 85 हजार 695 मतदारांपैकी 1 लाख 40 हजार 971 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कुमठा विधानसभा मतदारसंघात 76.93 टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण 191475 मतदारांपैकी 147307 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भटकळ मतदारसंघात 76 टक्के मतदान झाले. 2,27,706 मतदारांपैकी 173071 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यल्लापूर मतदारसंघात 79.96 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघात 149337 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतमोजणी केंद्रावर सीआरपीएफचे जवान तैनात
कारवार लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 4 जून रोजी कुमठा येथील डॉ. ए. व्ही. बाळाराम महाविद्यालयात होणार आहे. मतदारसंघातील मतदानयंत्रे यापूर्वीच महाविद्यालयात हलविण्यात आली आहेत. मतदान यंत्राच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.