For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अवती-भवती ८ मार्च २०२३

07:00 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
अवती भवती ८ मार्च २०२३

पॅसेंजरगाडी न थांबणारे स्थानक

Advertisement

पॅसेंजर रेल्वेगाडी प्रत्येक स्थानकावर थांबते अशी आपली समजूत आहे. बऱ्याच अंशी ती खरीच आहे. जलद गाड्या प्रत्येक स्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे या गाड्यांमधून प्रवास लवकर होतो आणि तो महागही असतो. तथापि, बिहारमध्ये असे एक रेल्वेस्थानक आहे, की जेथे कोणतीही पॅसेंजर गाडी थांबत नाही. या स्थानकावर केवळ जलद किंवा एक्स्प्रेस गाड्याच थांबतात. अशा प्रकारचे हे भारतातील एकमेव रेल्वे स्थानक असावे, असे बोलले जाते. बिहारमधील बरौनी हे असे स्थानक आहे. याचे आणखी महत्वाचे वैशिष्ट्या असे की, हे चक्क जंक्शन स्थानक आहे. कोणत्याही जंक्शन स्थानकावर पॅसेंजर असो किंवा कोणतीही गाडी असो, ती थांबलीच पाहिजे, असा नियम असतो. तथापि, या बरौनी जंक्शनवर केवळ एक्स्प्रेस, सेमीएक्स्प्रेस, जलदगती गाड्या, मालगाड्या अशा सर्व प्रकारच्या गाड्या थांबविल्या जातात. तथापि, या स्थानकावर कोणतीही पॅसेंजर गाडी मात्र थांबत नाही, भारतीय रेल्वेचे हे एक आश्चर्यच मानले जाते.

या स्थानकावरुन आपल्याला मुंबई, दिल्ली, कोलकाता आदी दूरच्या महानगरांना जाण्याचे तिकीट मिळते. पण जवळच्याच बेगुसराय, तिलस्थ, मोकामा या स्थानकांचे तिकिट मिळत नाही. कारण या स्थानकांवर केवळ पॅसेंजर गाड्या थांबतात आणि या बरौनी स्थानकावर मात्र केवळ जलदगती गाड्या थांबतात. रेल्वेच्या या आश्चर्यकारक नियमाचा प्रवाशांना मोठा त्रास होतो. कारण एखाद्या प्रवाशाला बेगुसरायपासून जवळच्या न्यू बरौनी स्थानकापर्यंत जायचे असेल तर त्याला एक्स्प्रेसचे तिकिट काढून बरौनी स्थानकापर्यंत जावे लागते. त्यानंतर रिक्षासाठी 25 रुपये खर्च करुन न्यू बरौनीपर्यंतचा प्रवास करावा लागतो. रेल्वेचे म्हणणे असे की या बरौनी स्थानकावर पॅसेंजर गाड्या थांबण्यासाठी योग्य ती सुविधा नाही. असे असेल तर येथे एक्स्प्रेस गाड्या कशा थांबतात, असा प्रश्नही विचारला जातो. दुसरे कारण असे दिले जाते की, पॅसेंजर गाड्यांना गर्दी जास्त असते. या स्थानकावर एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या किंवा जाणाऱ्या प्रवाशांसाठी अनुकूल सोयी नाहीत. हे कारणही लोकांना न पटणारे आहे. पण हे असे आहे एवढे खरे.

Advertisement

वस्त्राविनाच प्रवास

Advertisement

या जगात प्रत्येकाला तणावमुक्त जीवन जगण्याची आस आहे. सातत्याने दबावाखाली किंवा तणावाखाली राहणे कोणालाच आवडत नाही. पण सदासर्वकाळ तसे शक्य नसते. कारण आपल्याला जगण्यासाठी काम करावे लागते आणि काम म्हटले की ताण हा आलाच. मग तो घालविण्यासाठी बहुतेकजण संधी मिळाली की कामापासून दूर राहतात. प्रवास करतात किंवा अन्य मार्गांनी तणाव दूर करण्याचा प्रयत्न करतात. कित्येकांना अंगावरच्या कपड्यांचासुद्धा कंटाळा आलेला असतो. पण आपण एकटे आपल्या घरात असतानाही निर्वस्त्र रहात नसतो. तर अशा कंटाळाग्रस्त आणि तणावग्रस्त लोकांसाठी अमेरिकतील टेक्सास प्रांतातील ‘बेअर नेसेसिटीज’ नामक कंपनीने 1990 पासून एक उपक्रम चालविला आहे. ही कंपनी लोकांसाठी सागर प्रवास घडवून आणते. त्यासाठी कंपनीकडे प्रवासी नौका आहेत. येथे पर्यटकांना वस्त्रमुक्त आणि तणावमुक्त वातावरणाचा अनुभव मिळतो. मात्र, त्यासाठी कंपनीने अनेक नियमही बनविले आहेत. या नियमांचा भंग झाल्यास पर्यटकाचा प्रवास खंडित केला जातो. बंदरावरुन नौकेत येताना प्रत्येकाच्या अंगावर कपडे असणे आवश्यक आहे. तसेच भोजनकक्षातही प्रत्येकाने पूर्ण कपडे घालूनच वावरले पाहिजे. निर्वस्त्र अवस्थेत राहण्याची अनुमती केवळ आपल्या कक्षात गेल्यांनतरच दिली जाईल. तसे अशा अवस्थेतील सहप्रवाशांची छायाचित्रे काढून ती प्रसिद्ध करण्यास पूर्ण बंदी आहे. इतरांच्या देखत शारिरीक चाळे किंवा प्रेमाचे चाळे करण्यावर पूर्ण बंदी आहे. धोकादायक आणि असभ्य वर्तन खपवून घेतले जाणार नाही. अंमली पदार्थांचे सेवन करता येणार नाही किंवा ते जवळ बळगता येणार नाहीत, असे नियम करण्यात आले आहेत. ते पाळण्याची तयारी असलेल्यांसाठी हा प्रवास आहे.

विनामूल्य रहा,पण काही अटी

कोणतीही सुविधा असो किंवा वस्तू असो, ती विनामूल्य मिळत असेल तर जवळपास प्रत्येकाला हवीच असते, अशी स्थिती आहे. ब्रिटनमधील स्कॉटलंडनजीक एक बेट आहे. तेथे नोकरी किंवा व्यवसायासाठी वास्तव्यास येणाऱ्या प्रत्येकाला विनामूल्य आहार, पेयपान आणि राहण्यासाठी जागा मिळते. इतकेच नव्हे, तर जवळपास दीड कोटी रुपयांचे वार्षिक वेतनही मिळू शकते. इतके लाभ मिळविण्यासाठी काही अटींचे पालन कसोशीने करणे मात्र आवश्यक आहे. हे नितांतसुंदर असे बेट आहे. अशा बेटांवर सुटी घालविण्यासाठी खरे तर पर्यटक हजारो रुपये खर्च करण्यासाठी राजी असतात. पण या बेटावर मात्र तऱ्हा उलटीच आहे. या बेटाचे नाव ‘उईस्ट आणि बेनवेकुला’ असे आहे. ते स्कॉटलंडच्या पश्चिम सागरतटाच्या नजीक आहे. इतक्या सोयी विनामूल्य असूनही आणि वर भरपूर पैसे मिळणार असूनही या बेटाची लोकसंख्या केवळ 40 इतकीच आहे. येथे नुकतीच शासकीय नोकरभरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हे बेट पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून डॉक्टर्सची नियुक्ती करण्याचे काम सुरु आहे. तेव्हा या बेटावर सर्वकाही विनामूल्य मिळवायचे असेल आणि शिवाय भक्कम वेतनही पदरात पाडून घ्यायचे असेल तर आपण डॉक्टर असणे आवश्यक आहे. ही अट पूर्ण करणाऱ्या पात्र व्यक्तीस येथे नोकरी किंवा व्यवसाय करण्याची इच्छा असल्यास त्याला या सर्व सुविधा आणि मोठे वेतन मिळेल, अशी घोषणा करण्यात आली आहे.

१८९ कोटी रुपयांचा टॉयलेट

जगात आज अंतराळ प्रवासाची व्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक कंपन्या यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही कंपन्यांनी मर्यादित काळासाठी काही हौशी प्रवाशांना प्रयोगात्मक पद्धतीने असा प्रवास घडवूनही आणला आहे. येत्या 25 ते 50 वर्षांमध्ये असा अंतराळ प्रवास अप्रूप राहणार नाही, असेही बोलले जाते. ‘चंदामामा दूर के’ असे न राहता, ‘चंदामामा टूर के’ अशी स्थिती होईल, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही काळापूर्वी केले होते. त्याची प्रचीती काही दशकांमध्ये येईल, अशी स्थिती निश्चितपणे निर्माण झाली आहे. पण अंतराळ प्रवास हा नेहमीच्या प्रवासासारखा सोपा आणि स्वस्त नसतो. त्यासाठी फार मोठी यंत्रणा उभी करावी लागते. हा प्रवास धोक्याचा असल्याने सुरक्षेची सर्व दक्षता घ्यावी लागते. यासाठी मोठा खर्च येतो. इतकेच नव्हे, तर अंतराळ प्रवाशांसाठी टॉयलेटची व्यवस्था करणे हे या प्रवासातील मोठे आव्हान असते. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने अशा टॉयलेटची निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. अंतराळात उपयोगी पडेल असा टॉयलेट बनविण्यासाठी तब्बल 189 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. टॉयलेटची व्यवस्था इतकी महाग तर मग एकंदर अंतराळ प्रवास किती खर्चाचा असेल याची कल्पना आपण करु शकतो. अर्थातच ही बाब सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नाही हे स्पष्ट आहे. पण भविष्यात हा खर्च कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला जातो. आता टॉयलेटसाठी इतका खर्च का असा प्रश्न आपल्याला पडेल. तर त्याचे करण असे की अंतराळात गुरुत्वाकर्षणाचा जोर अत्यल्प असतो. त्यामुळे टॉयलेटची रचना त्या स्थितीला अनुसरुन करावी लागते, त्यामुळे असा टॉयलेट निर्माण करण्यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञानच विकसीत करावे लागत आहे.

पोत्यांचा वेषभूशेला लोकप्रियेता

कोणती फॅशन केव्हा आणि कशी आणली जाईल आणि ती लोकप्रिय होईल याविषयी कोणीच काही सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. निरनिराळ्या फॅशन्स रुढ करणारे कल्पक लोक कशापासूनही काहीही बनवितात. ते अंगावर मिरवितात आणि असा ट्रेंड लोकप्रिय झाला तर अशा फॅशनचा धंदाही जोरदार चालतो. अशीच एक फॅशन सध्या रुढ करण्याचा प्रयत्न होत आहे. ही फॅशन आहे पोत्यांपासून केलेल्या कपड्यांची. अनेक मॉल्समध्ये सध्या असे पोत्यांपासून बनविलेले शर्ट, पँट आणि इतर कपडे घालून त्यांची जाहिरात करणारे लोक दिसून येतात. त्यांचे पाहून मग इतरांनाही तसेच कपडे घालावेसे वाटतात. परिणामी, या पोत्यांपासून बनविलेल्या कपड्यांची विक्री अनेक मॉल्समधून होत आहे. ही पोतीही नवी किंवा कपडे तयार करण्यासाठी बनविलेली नसतात. तर ती चक्क फाटकी किंवा उपयोग करुन टाकून दिलेली असतात. हा एक टाकाऊतून टिकाऊ असा प्रयोग असल्याचे या फॅशनकर्त्यांचे म्हणणे असते. काही स्थानी या वैचित्र्यपूर्ण कपड्यांची एवढी क्रेझ निर्माण झाली आहे, की हे कपडे खुल्या बाजारात मिळत नाहीत. तसेच कॅश ऑन डिलिव्हरी अशा प्रकारेही मिळत नाहीत. तर ते मिळविण्यासाठी आधी पूर्ण पैसे भरुन ऑर्डर द्यावी लागते. शिवाय या कपड्यांना लागणारा कच्चा माल कवडीमोल असला तरी तयार कपड्यांची किंमत मात्र बरीच जास्त असते. कारण या कपड्यांना अनेकांकडून मोठीच मागणी आहे. ही नवी फॅशन किती दिवस अशी लोकप्रिय राहील याची मात्र, कोणी शाश्वती देऊ शकत नाहीत. कारण शेवटी ती फॅशन आहे.

Advertisement
Tags :
×

.