अवती-भवती २१ जुलै २०२४
प्रेमिकेच्या सतत सहवासासाठी...
पती-पत्नीचे नाते हे जगातील कोणत्याही नात्यापेक्षा सर्वाधिक जवळचे असते, असे मानण्याची पद्धत आहे. कारण याच नात्यातून इतर सारी नाती निर्माण होत असतात. अनेक पतीपत्नींचे एकमेकांवर निरतिशय प्रेम असते. जास्तीत जास्त काळ त्यांना एकमेकांच्या सहवासात रहावे असे वाटते. असे असले तरी केवळ पत्नीचा सहवास मिळावा म्हणून प्रतिदिन 320 किलोमीटरचा प्रवास करणारी व्यक्ती दुर्मिळच म्हणावी लागेल. पण असा एक व्यक्ती चीनमध्ये आहे. त्याचे नाव लिन शू असे असून त्याचे वय 31 वर्षांचे आहे. तो आपल्या कार्यालयात जाण्यासाठी जाताना 160 किलोमीटर आणि येताना तितकाच, असा 320 किलोमीटरचा प्रवास करतो. हा प्रवास करण्यासाठी त्याला 6 तास लागतात. कामाचे किमान आठ तास धरुन त्याचा जवळपास 14 ते 15 तासांचा वेळ केवळ प्रवास आणि काम यांच्यात जातो. तो असे का करतो, याचे उत्तर त्याच्या पत्नीप्रेमात दडलेले आहे. सात वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनशिपनंतर आता त्यांचा विवाह ठरला आहे. तिच्यावाचून त्याला करमत नाही. त्याची प्रेमिका ज्या गावात राहते तेथेच त्यांचे घर आहे. तिचे कार्यालय घरापासून जवळ आहे. तो जेथे कामाला जातो तेथेच घर का घेत नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण तसे केल्यास त्याला भावी पत्नीपासून दूर रहावे लागणार आहे, जे त्याला नको आहे. त्याच्या भावी पत्नीला तिथे काम शोधण्याची इच्छा नाही आणि त्याला घराजवळ नोकरी मिळू शकत नाही. त्यामुळे त्याने रोजचा 320 किलोमीटरचा प्रवास पत्करला आहे.
असाही एक ‘निग्रही’ पक्षी...
विकासाच्या नावाखाली मानवाची निसर्गाच्या क्रियाकलापांमध्ये नको इतकी ढवळाढवळ होत आहे. विकासाच्या कधीही न भागणाऱ्या भुकेपोटी मानव निसर्गाच sअमर्याद शोषण करीत आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने सृष्टीतील इतर प्रजातींच्या अधिवासांवर आक्रमण केल्याने त्या प्रजातींचा मानवाशी संघर्ष होत आहे. ‘मानववस्तीत बिबट्या शिरल्याने घबराट’ अशा मथळ्यांची वृत्ते आपण नेहमी वाचतो. वास्तविक बिबट्या मानववस्तीत शिरलेला नसतो. तर मानवानेच बिबट्याच्या अधिवासात अतिक्रमण केलेले असते, हे सत्य कोणी लक्षात घेत नाही. मानव विरुद्ध इतर प्रजाती यांच्या संघर्षात बहुतेकवेळा मानवाची सरशी होते कारण त्याला बुद्धीची देणगी आहे. तथापि, काहीवेळा इतर प्रजातींमधील सजीव मानवाला माघार घेण्यासही भाग पाडतात. असाच एक आश्चर्यकारक प्रसंग ब्रिटनच्या वेल्स या शहरात घडला आहे. आज ही घटना साऱ्यांचा चर्चेचा विषय बनली आहे.
या शहरात नगरपालिकेच्या मालकीचे एक जुने चित्रपटगृह पाडले जाणार होते. ते पाडण्याच्या कामाला प्रारंभही करण्यात आला. तथापि, या चित्रपटगृहाच्या छतावर एका सीगल पक्षाचे (समुद्रपक्षी) घरटे होते. तेही पाडले जाणार होते. तथापि, त्या पक्षाने ते पाडू दिले नाही. पाडकाम करणारे कामगार घरट्याच्या जवळ आले की, तो पक्षी त्यांच्या अंगावर झेप घेत असे आणि आपल्या चोचीने त्यांना जखम करीत असे. या घरट्यात त्या पक्षाची नुकतीच जन्माला आलेली पिले होती. त्यांच्या संरक्षणासाठी तो प्राणपणाने माणसासारख्या ‘शत्रू’शी संघर्ष करीत होता. अखेर त्या पक्षाची पिले उडण्याच्या स्थितीत येईपर्यंत पाडकाम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास दीड महिना काम थांबविण्यात आले होते. नंतर आपल्या पिलासह त्या पक्षाने घरटे सोडल्यानंतर चित्रपटगृह पाडण्यात आले. एक, प्रकारे या पक्षाने माणसासारख्या बलाढ्या शत्रूशी केलेला संघर्ष जिंकला होता. जवळपास दीड महिना थांबल्यामुळे ती इमारत पाडविण्याच्या खर्चात वाढही झाली होती. त्यामुळे नगरपालिकेची जवळपास पाच कोटी रुपयांची हानी झाल्याचे सांगण्यात आले. अखेर ही हानी स्थानिक नागरीकांवर थोडा जास्त कर आकारुन भरुन काढण्यात आली. मानवाची विकासाची भूक आणि त्यामुळे त्याचा इतर प्रजातींशी होत असलेला संघर्ष भविष्यकाळात वाढतच जाईल आणि अंतिमत: तो जीवसृष्टीच्या नाशालाही कारणीभूत होऊ शकतो, हा धडा या प्रसंगावरुन मानवाने शिकणे आवश्यक आहे असे अनेक पर्यावरणप्रेमी आणि पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे.
बहात्तराव्या वर्षी मिळाले काम...
आपले वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक झाले की, काम करण्याचा उत्साह कमी होत जातो, याचा अनुभव त्या वयातील जवळपास प्रत्येकाला आहे. हे वय उलटल्यानंतर नवे काम, ज्याचा आधी कधी अनुभव नसतो, ते सहसा कोणीही करीत नाहीत. शारिरीक श्रमाची कामे तर टाळलीच जातात. कारण त्या वयात कामापेक्षा आपली प्रकृती सांभाळणे हेच महत्वाचे मानले जाते. तथापि, ब्रिटनच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये काम केलेल्या जॅकी स्मिथ या आजीबाई याला अपवाद आहेत. त्यांचे वय आज 72 वर्षांचे आहे आणि या वयातही त्यांना एक नवे काम मिळाले आहे. त्यांच्या वयाच्या माणसांना जे काम करु दिले जात नाही, ते त्या करतात.
सावत्र भावावरच जडले प्रेम...
शुक्राणू दान तंत्रज्ञान (स्पर्म डोनेशन टेक्निक) आता समाजात चांगलेच स्थिरावले आहे. हे तंत्रज्ञान विशिष्ट शारिरीक दोषांमुळे अपत्य होऊ न शकणाऱ्यांसाठी मोठेच वरदान ठरत आहे. मात्र, यामुळे एक महत्वाची समस्याही निर्माण होऊ शकते. असाच एक प्रकार डच संगीतकार आणि ब्लॉगर जोनाथन मेजियर यांच्या संदर्भात घडला आहे. मेजियर यांच्या स्पर्म डोनेशनमुळे निकोलेट नामक महिला एका कन्येची माता बनली. मेजियर यांनी इतर अनेक महिलांनाही शुक्राणू दान केले आहे, याची या महिलेला कल्पना नव्हती. तिची कन्या 11 वर्षांची झाली तेव्हा तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या एका मुलाबरोबर तिची मैत्री झाली. इतकी, की ती इतक्या लहान वयातच त्याच्यावर प्रेम करु लागली. कन्येचे हे प्रताप लक्षात येताच मुलगा कोणाचा आहे याची माहिती या महिलेने काढली. ही माहिती तिच्यासाठी अत्यंत धक्कादायक होती. तिच्या 11 वर्षांच्या कन्येचा 13 वर्षांचा प्रियकर मेजियर यांच्याच शुक्राणू दानातून जन्मला आलेला होता. एका अर्थाने तो या महिलेल्या कन्येचा सावत्र बंधूच होता. अर्थात ते प्रेमात पडले तेव्हा दोघांनाही याची कल्पना नव्हती. आता या महिलेची चांगलीच कोंडी झाली. तिने आपल्या कन्येला तिचा प्रियकर तिचा सावत्र बंधूच असल्याचे सांगितले. हा साराच प्रकार या तिघांसाठीही चक्रावून टाकणारा आहे आणि पुढे या बालवयातील प्रेमप्रकरणाचे काय करायचे, हा प्रश्न या महिलेला पडला आहे. मेजियर यांनी जवळपास 1000 महिलांना शुक्राणू दान केल्याची माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ही 1000 अपत्ये भिन्न भिन्न महिलांची असली तरी एकमेकांची सावत्र भावंडेच आहेत. पण त्यांना हे माहित असण्याची शक्यता कमी आहे. अशा अज्ञानातून जर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले तर मोठी समस्या उद्भवू शकते. कारण बंधू-भगिनीत प्रेम जुळणे आणि त्यांचा विवाह होणे हे आधुनिक विज्ञानालाही मान्य होत नाही. कारण अशा जवळच्या नातेसंबंधांमधून (इंटरब्रिडींग) निर्माण होणारी संतती दुर्बल आणि जन्मत: शरीर दोष असणारी असण्याची शक्यता अधिक असते. कित्येक देशांमध्ये अशा संबंधांवर बंदीही आहे.
चार आण्याची कोंबडी आणि...
चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला ही म्हण आपल्यापैकी बहुतेकांच्या परिचयाची आहे. तिचा सर्वसाधारण अर्थ छोट्या बाबीसाठी मोठा भुर्दंड सोसावा लागणे, असा आहे. असाच अनुभव पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या कुटुंबाला आला आहे. ओक्लोहोमा येथील जोशुआ गॉल्ट, त्यांची पत्नी आणि त्यांची 6 अपत्ये तसेच गॉल्ट यांची वृद्ध माता, असे 9 जण प्रवासी नौकेतून (क्रूझ) अलास्का प्रांतातील एका बेटाच्या सहलीला निघाले. त्यांनी 24 लाख रुपयांचे तिकिट खरेदी केले. वाटेत केचिकन नामक शहरात हे कुटुंब फिरावयास म्हणून नौकेतून उतरले. पण व्रूझ सुटण्याच्या वेळेत पोहचू शकले नाही. त्यांच्या मार्गदर्शकाच्याही लक्षात ही बाब आली नाही. त्यामुळे त्यांचा प्रवास कॅनडातच थांबला. क्रूझमध्ये या कुटुंबाचा औषधे आणि पासपोर्ट होता. औषधे त्यांना पुन्हा विकत घ्यावी लागली. शिवाय पासपोर्ट नसताना कॅनडात राहिल्यामुळे मोठा दंडही भरावा लागला. तसेच नौकेवर वेळेत न पोहचल्यामुळे आणखी 7 लाख रुपयांचा दंड कायद्यानुसार भरावा लागला. शिवाय पुन्हा घरापर्यंतचा प्रवास स्वत:च्या खर्चाने करावा लागला. केचिकन शहरात त्यांना पुढची व्यवस्था होईपर्यंत तीन दिवस स्वत:च्या खर्चाने रहावे लागले. अशा प्रकारे 24 लाख रुपयांच्या प्रवासासाठी आणखी जवळपास पन्नास लाख रुपये मोजावे लागले. याची भरपाई मिळेल असे आश्वासन क्रूझ कंपनीने दिले आहे. हे कुटुंब या प्रतीक्षेत आहे.