For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवती-भवती रविवार दि ,७ एप्रिल २०२४

07:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
अवती भवती रविवार दि  ७ एप्रिल २०२४
Advertisement

याला म्हणावे तरी काय ?

Advertisement

शिस्तबद्धता, व्यवहारीपणा, शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन करणे, भावनेच्या आहारी न जाणे, एकमेकांच्या खासगी आयुष्यात न डोकावणे इत्यादी नियमांमुळे पाश्चात्य संस्कृती अनुकरणीय मानली जात आहे. या संस्कृतीत नातेसंबंध, नात्यांवरील अवलंबित्व अशा बाबींना कमी स्थान असते, हेही सर्वांना ज्ञात आहे. तथापि, अनेकदा याचा अतिरेक झाला की, अनेक प्रश्न निर्माण होतात. मध्यप्रदेशातील इंदूर येथे नुकतीच अशी हृदयाला (निदान आपल्या भारतीय हृदयाला) चटका लावणारी घटना घडली आहे. या इतिहासप्रसिद्ध शहराला सातत्याने अनेक विदेशी पर्यटक भेट देत असतात. ऑस्ट्रेलियाहून गेव्हीन बॅली नामक एक वयस्कर पर्यटक या शहरात आला होता. पण पर्यटन हा त्याचा एकमेव हेतू नव्हता. इंदूर शहरात त्याला एक सौरऊर्जा प्रकल्प स्थापन करायचा होता. येथील ग्रँड सूर्या हॉटेलात तो वास्तव्यास असताना त्याचा मृत्यू झाला. तो एकटाच असल्याने पोलिसांनी ऑस्ट्रेलियात त्याच्या पुत्राशी संपर्क करुन त्याला भारतात येऊन पित्याचा मृतदेह घेण्याची विनंती केली. तथापि, त्याच्या ख्रिश्तोफर नामक पुत्राने सरळ नकार दिला. इतकेच नव्हे, तर विमानाने मृतदेह पाठविण्याचीही आवश्यकता नाही. आपणच मृतदेहावर भारतीय पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करावेत आणि आम्हाला रक्षा पाठवावी, असा निरोप त्याने ईमेलद्वारे धाडला. ईमेलच्या माध्यमातूनच त्याने सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली.  बॅली याचे इतर कोणी नातेवाईकही भारतात आले नाहीत. अखेर इंदूर पोलिसांनीच त्याच्या मृतदेहावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले आणि रक्षा ऑस्ट्रेलियाला पाठविण्याची व्यवस्था केली. बॅली आणि त्यांचा पुत्र यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तरीही पुत्राने भारतात येण्याची तयारी दर्शविली नाही. ही बाब आपल्या भारतीय मनाला तरी पटण्यासारखी नाही, हे निश्चित आहे. बॅली यांच्या पुत्राच्या या वर्तणुकीला व्यवहार्यता म्हणावे की, भावनाशून्यता ?

झटक्यात फेडली 64 लाखाची उधारी

Advertisement

सर्व व्यसनांमध्ये जुगाराचे व्यसन सर्वात हानीकारक आहे. कारण जुगारामुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते होते. अनेकजण जुगारात झटपट श्रीमंत होण्याच्या नादाला लागून, सर्व मालमत्ता गमावून भुकेकंगाल झाले आहेत, तर काहींनी या मोहापायी मोठे कर्ज स्वत:वर लादून घेऊन स्वत:च्या हाताने स्वत:ची माती करुन घेतली आहे. ब्रिटनच्या वेल्स भागातील एक व्यक्तीने असेच जुगाराच्या नादाला लागून स्वत:वर 64 लाख रुपयांचे कर्ज करुन घेतलेले होते. पण त्याने ते पाच वर्षांमध्ये फेडले आणि तो बचावला. एक अतिशय कल्पक ‘जुगाड’ करुन त्याने हे कर्ज फेडले आहे, आणि आता तो अनेकांच्या कौतुकाचा विषय झालेला आहे. या व्यक्तीचे नाव अँड्रयू असल्याचे सांगितले जाते. कर्जबाजारी झाल्यानंतरही त्याने आपले डोके शांत ठेवले आणि तो या कर्जाच्या विळख्यातून कसे मुक्त व्हायचे याचा विचार करु लागला. त्याला एक उपाय सापडला. त्याने ‘धर्मादाय व्यापार’ क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. तो क्रिस नामक एका युट्यूबरच्या ‘एव्हरीथिंग रिसेलिंग’ नामक शो मध्ये समाविष्ट झाला. काही काळातच त्याने स्वत:च धर्मादाय व्यापारात भाग घेण्यास प्रारंभ केला. धर्मादाय व्यापार किंवा चॅरिटी शॉप्स ही अशी दुकाने असतात की जेथे लोक आपल्या जुन्यापुराण्या वस्तू आणून देतात. नंतर असे दुकानदार या वस्तू स्वस्त दरात ज्यांना हव्या असतील त्यांना विकतात. अँड्य्रू यांनी असे सामान कवडीमोल दराने विकत घेण्यास प्रारंभ केला. नंतर अशा वस्तूंची डागडुजी करुन त्या ई-बे, अमेझॉन आणि फेसबुकसारख्या माध्यमांमधून विकण्यास प्रारंभ केला. यातून त्याला मोठा लाभ होऊ लागला. अखेर पाच वर्षांच्या कालावधीनंतर तो पूर्णत: कर्जमुक्त झाला. शिवाय त्याला सन्मानाने करता येईल असा नवा व्यवसायही आता सापडला आहे. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती सुधारली आहे. पुन्हा जुगार नाही, असा निर्धारही त्याने आता केला आहे.

कोणीही या...सोने शोधा

आपल्यापैकी बहुतेकांना सोन्याचे आकर्षण जबरदस्त असते, ही वस्तुस्थिती आहे. भरपूर सोने, म्हणजे भरपूर श्रीमंती हे समीकरण सोन्याचा शोध लागल्यापासूनचे आहे. तथापि, शुद्ध स्वरुपात सोने मिळविणे हे सोपे नसते. सोने खाणींमध्ये मिळते आणि ते महत्प्रयासाने स्वच्छ करावे लागते. शिवाय त्याचे प्रमाणही खूपच कमी असते. म्हणूनच त्याला इतकी मोठी किंमत दिली जाते. तथापि, या जगाच्या पाठीवर एक देश असा आहे, की, जेथे कोणीही जाऊन सोन्याचा शोध घेऊ शकतो. सोने त्याला सापडल्यास ते त्याचेच असेल. ते त्याला सरकारी तिजोरीत जमा करावे लागणार नाही. या देशाचे नाव आहे उझबेकिस्तान. हा देश आशिया खंडाच्या वायव्येला आणि रशियाच्या दक्षिणेला स्थित आहे. काही दशकांपूर्वी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत सोन्याच्या खाणी होत्या. तेव्हा त्या देशांमध्ये अशीच जगभरातून माणसांची रीघ लागली होती. सोने शोधणे आणि श्रीमंत होणे या ध्येयाने वेडे झालेले अनेक लोक तेथे  जाऊन मालालमा तरी झाले होते किंवा कफल्लक तरी. काही काळानंतर त्या देशांमधील सोन्याच्या खाणी आटल्या. नंतर लोकांची रीघही कमी झालेली आहे. आता उझबेकिस्तानने यासाठी आपले दरवाजे उघडले आहेत. सोने उत्पादनात आज हा देश जगात दहाव्या क्रमांकावर आहे. 2030 पर्यंत सोन्याचे उत्पादन 50 टक्के वाढविण्याची या देशाची योजना आहे. 2019 मध्ये या देशाने सोने खुदाई सरकारी नियंत्रणातून मुक्त केल्याने आता तेथे जगभरातून लोक जात आहेत. सोन्याच्या मोहापायी ते येथील मोठे भूखंड मोठ्या किमतीला विकत घेत आहेत. यामुळे या देशाची तिजोरी घरबसल्या भरली जात आहे. प्रत्येक भूखंडात सोने सापडेलच याची शाश्वती नसते. तरीही अनेक धनिक लोक येथे आपल्या भाग्याची परीक्षा पाहण्यासाठी भूखंडांमध्ये गुंतवणूक करीत आहेत. या देशाच्या किमान 20 टक्के भूमीत सोने सापडण्याची शक्यता असल्याचे तज्ञांचे मत आहे.

शांत झोपेसाठी रामबाण उपाय

सध्याच्या धाकाधाकीच्या आणि अतिस्पर्धेच्या काळात ‘शांत झोप’ दुर्मिळ झाली आहे. सतत कामाचा तणाव, वेळीअवेळी खाणेपिणे, रात्री उशीरापर्यंत जागणे, पोषक आहाराऐवजी फास्टफूडला महत्व, इत्यादी कारणांमुळे सहा ते सात तास निद्रेचा बळी गेला आहे. यामुळे शरीर अनेक रोगांचे आणि विकारांचे आगर होत आहे. शांत झोप कशी येईल, यावर बरेच संशोधन जगभरात केले जात आहे. शांत झोप येण्यासाठी एक अतिशय सोपा पण अत्यंत प्रभावी असा उपाय या संशोधनांमधून हाती लागला आहे. तो केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारुन माणसाला ताजेतवाने वाटते आणि त्याच्या शरीरप्रकृतीची निगाही व्यवस्थित राखली जाते, असे या संशोधनातून दिसून आले आहे. तसे पाहिल्यास हा उपाय आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. संशोधनातून त्यावर नवा प्रकाश पडला आहे इतकेच. हा उपाय आहे, नियमित व्यायामाचा. वर्षातील साधारणत: 300 दिवस प्रतिदिन 50 ते 60 मिनिटे आपल्याला जमतो तो किंवा आपल्याला आवडतो तो व्यायाम केल्यास झोप सुधारते, हे नव्याने सिद्ध झाले आहे. व्यायाम प्रकार आपण आपल्या शरीराच्या ठेवणीनुसार झेपेल तो आपण निवडू शकतो. मात्र, व्यायामाचा प्रकार असा हवा की, ज्यात शरीराची वेगाने हालचाल झाली पाहिजे. व्यायामामुळे शरीरातील रासायनिक समतोल योग्य प्रकारे राखला जातो. हा समतोल शांत झापेसाठा कारणीभूत असतो. आपले इतर जीवन काही प्रमाणात अनियमित असले तरी, विशिष्ट वेळी न टाळता व्यायाम केल्यास झोपेत आणि त्यामुळे प्रकृतीत अतिशय सकारात्मक परिवर्तन घडते, असे आता पुन्हा स्पष्ट झाले आहे.

भूमीत ’कळसा’...विश्वाला ‘वळसा’

पृथ्वीवर पाणी आले कोठून, याचे संशोधन गेली 200 वर्षे जगभरात होत आहे. हे पाणी पृथ्वीवर उल्कापातातून आले असावे, असे अनुमान काढण्यात आले आहे.  अशा ‘पाणीदार’ उल्का शोधण्याचा प्रयत्नही संशोधक करीत आहेत. पृथ्वीबाहेरच्या विश्वात या उल्कांची निर्मिती कोठे होत असावी आणि त्यांच्यात जल कसे निर्माण होत असावे, यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होऊनही या प्रश्नाच्या उत्तराने आजवर हुलकावणीच दिली आहे. पण अलिकडच्या काळात असा शोध लागला आहे, की हे पाणी पृथ्वीवर बाहेरुन आलेले नसून ती इथलीच निर्मिती आहे. ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ ही म्हण आपल्या परिचयाची आहे. तसाच प्रकार पृथ्वीवरील पाण्याच्या संदर्भात घडल्याचे दिसून येते. पृथ्वीच्या पोटात 700 किलोमीटर खोलवर पाण्याचा प्रचंड साठा आहे, असे संशोधनात आढळून आले आहे. हे पाणी जगात सध्या उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या तिप्पट आहे, असे संशोधकांचे अनुमान आहे. हे पाणी पृथ्वीच्या इतके आतमध्ये आहे की ते उल्कापातामुळे येथे आले असणे शक्य नाही. त्यामुळे पाण्याची निर्मिती ही पृथ्वीवरच झालेली आहे, असा नवा निष्कर्ष काढण्याप्रत संशोधक पोहचले आहेत. अर्थात, हे संशोधन अद्याप बाल्यावस्थेत आहे. त्यावर आणखी विचार होणे आवश्यक असून संशोधक अधिक ‘खोलात’ शिरतील अशी शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.