For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिमाचलमध्ये हिमस्खलन, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

06:55 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिमाचलमध्ये हिमस्खलन  काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
Advertisement

नेहरू कुंडजवळ अनेक वाहने उलटली : जोरदार बर्फवृष्टीमुळे रेड अलर्ट

Advertisement

वृत्तसंस्था/ मनाली, नवी दिल्ली

हिमाचल प्रदेशमधील सोलंग येथे शनिवारी हिमस्खलनाची दुर्घटना घडली. येथे नेहरू कुंडजवळ रस्त्याच्या कडेला उभी केलेली अनेक वाहने हिमस्खलनामुळे उलटली. या घटनेत कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नसले तरी अनेक ठिकाणी पर्यटक अडकून पडले आहेत. याशिवाय हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. दोन्ही राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्यप्रदेश आणि दिल्लीत शुक्रवारी रात्री हलका रिमझिम पाऊस झाला. तसेच उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

Advertisement

हिमाचलमध्ये सतत बर्फवृष्टी होत असताना शनिवारी मनालीमध्ये हिमस्खलन झाल्यामुळे मनाली-सोलंगनाला रस्त्यावर नेहरू कुंडजवळ अनेक वाहने पलटी झाली. याचा भयानक व्हिडिओही समोर आला आहे. या हिमस्खलनात पाच वाहनांना फटका बसला. मात्र, सुदैवाने गाडीत कोणीही नव्हते. अशा परिस्थितीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. हिमांच्या ढिगाऱ्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हवामानाची परिस्थिती पाहता प्रशासन आणि वाहतूक विभागाने पर्यटक आणि प्रवाशांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. तर शेतकऱ्यांना या काळात सिंचन आणि इतर शेतीची कामे थांबवण्यास सांगण्यात आले आहे.

हिमस्खलनावेळी रस्त्याच्या कडेला वाहने उभी होती. त्याचवेळी अचानक डोंगरावरून हिमकडे कोसळले. अचानक दरड कोसळल्याने लोक जीव वाचवण्यासाठी धावत सुटले.  सध्या प्रशासन घटनास्थळी असून स्थानिक लोकांच्या मदतीने वाहने बाहेर काढण्यात येत आहेत. तसेच चंबा जिह्यात पावसामुळे दरड कोसळून तीन घरांचे नुकसान झाले. हिमाचलच्या अटल टनेल, रोहतांग, केलांग, जिस्पा, दारचा, कोकसर आणि लाहौल व्हॅलीमध्ये 4 ते 6 इंचांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली आहे. अटल बोगद्यासाठी वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. लाहौल स्पितीमध्ये सर्वाधिक रस्ते बंद आहेत.

प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

बनिहाल आणि रामबन सेक्टर दरम्यान अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह, मुगल रोड, सिंथन-किश्तवार, बांदीपोरा-गुरेझ आणि कुपवाडा-तंगधर रस्त्यावरही वाहतूक ठप्प आहे. खराब हवामानामुळे राजौरी जिह्यातील सर्व शाळा शनिवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या.

हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान विभागाने शनिवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली येथे पाऊस, वादळ आणि गारपिटीचा इशारा जारी केला आहे. याशिवाय बिहार, छत्तीसगड, गुजरात, सिक्कीम, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये रिमझिम पावसाची शक्मयता आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्मयता आहे. दिल्लीत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. पंजाबमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्मयता आहे.

Advertisement
Tags :

.