For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

06:30 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Advertisement

मार्गशीर्ष महिना आला की श्री दत्तप्रभूंच्या भक्तांच्या हृदयामध्ये आनंदाच्या लहरी उसळतात. त्यांना श्री गुरुचरित्र सप्ताहाचे वेध लागतात. श्री दत्तप्रभू आणि श्री गुरुचरित्र ग्रंथ चिरंजीव आहे. श्री दत्तप्रभूंचे वैशिष्ट्या म्हणजे श्री दत्तांना काळाचा स्पर्श नाही. भगवान श्रीधर स्वामी म्हणतात, ‘अवतार उदंड होती, सवेची मागुती विलया जाती, तैसी नोहे दत्तमूर्ती, नाश कल्पांती असेना’. असे श्री दत्तप्रभू भक्तांच्या एका हाकेसरशी केव्हाही, कधीही, कुठेही, कोणत्याही रूपात प्रकट होतात आणि त्यांच्या संकटांचे निवारण करतात.

Advertisement

एखादी व्यक्ती आयुष्यामधल्या आणीबाणीच्या क्षणी अकस्मात धावून येते तेव्हा व्यवहारात तिला साक्षात दत्त म्हणून उभे राहिलात, असे म्हणतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत’. श्री दत्तात्रय हे पूर्णावतार आहेत. श्री दत्तप्रभू हे मानवी अवतार नाहीत. त्यांना मानवी देह नाही, म्हणून मानवी देहाच्या कुठल्याही मर्यादा त्यांना नाहीत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय अशी एकत्र शक्ती श्री दत्तांमध्ये सामावली आहे. श्री दत्तप्रभूंजवळ सर्वधर्मसमभाव आहे. संत एकनाथ महाराजांना त्यांनी फकीरवेषात दर्शन दिले. समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रातही श्री दत्तात्रयांनी त्यांना मलंगवेषात दर्शन दिल्याची कथा आहे. प्रत्येक देवतेची पूजासामग्री, नैवेद्य वेगवेगळे असतात. श्री दत्तप्रभूंचे मात्र तसे नाही. श्री दत्तप्रभूंना बिल्वपत्र, तुळस, पांढरी-लाल फुले, दुर्वा सारे चालते. श्री दत्तप्रभूंजवळ रुद्रपठण करतात आणि विष्णूसहस्रनामही म्हणतात. श्री दत्त या देवतेचा वास प्रत्येक मानवी शरीरात आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या घडामोडी सतत देहात घडत असतात. जुन्या पेशींचा लय होतो, नव्या पेशी तयार होतात. सप्तधातूंची निर्मिती होते. देह हा सात विकारांनी बांधलेला आहे. शेवटी त्याचा क्षय आहे आणि त्यानंतर पुन्हा देहनिर्मिती आहे.

प. प.  वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी श्री दत्तप्रभूंना विनवताना वारंवार करुणाघन या विशेषणाने संबोधतात. जय करूणाघन, करुणाघन दत्ता असे ते करुणात्रिपदी रचनेत म्हणतात. उदारतेमध्ये घनाची तुलना कशाशीच होत नाही. घनांच्या नि:स्वार्थ उदारतेमुळे जीवसृष्टी अस्तित्वात आहे. श्री दत्तप्रभू हे करुणाघन आहेत, म्हणजे त्यांची करुणा अपार आणि उदार आहे. करुणा याचा अर्थ निरपेक्ष ओलावा, आपुलकी असणारे प्रेम असा आहे. श्री दत्तप्रभू जिवाचा स्वभाव, कर्म, प्रारब्ध न बघता भक्तांवर करुणावृष्टी करतात. प. प. टेंबे स्वामी करुणात्रिपदीमध्ये म्हणतात, ‘सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार, तव पदी अर्पू असार, संसाराहित हा भार’.  श्री दत्तप्रभूंना एकट्या भक्तापेक्षा समूहभक्ती आवडते. संपूर्ण कुटुंब आणि परिवार जेव्हा दत्तभक्तीमध्ये तल्लीन होतात तेव्हा श्री दत्तप्रभू कृपेचा वर्षाव करतात.

Advertisement

श्री दत्तप्रभूंची वैशिष्ट्यो सांगताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘काखे झोळी, पुढे श्वान..’ भिक्षा हे दत्तसंप्रदायाचे प्रधान सूत्र आहे. दुपारी बारा वाजता श्री दत्तप्रभूंची कोल्हापूरला भिक्षेसाठी श्री अंबाबाईच्या देवळात फेरी असते. दत्त याचा दुसरा अर्थ दान असा आहे. श्री दत्तांनी स्वत:लाच दान केले आहे. दानाचे वैशिष्ट्या म्हणजेच दानाचे नेहमी संक्रमण होते. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी श्री शारदामाता यांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. शारदामातांकडे रोज एक बारा-तेरा वर्षाची मुलगी भुकेच्या वेळी दारी येत असे. त्या तिला जेवू घालत. तिचा आवाज गोड होता म्हणून शारदा माता तिला देवाचे भजन म्हणायला सांगत. एक दिवस तिला कुणीतरी भिक्षेत छानसा पेरू दिला. रोज जेवू घालणाऱ्या शारदा मातांना तिने तो पेरू मोठ्या आनंदाने अर्पण केला. माताजी भक्तांना म्हणाल्या, बघा दानाचा संस्कार कसा रुजला तो!  रोज मागणाऱ्या मुलीला आज काहीतरी द्यावेसे वाटले.

श्री दत्तात्रयांची झोळी ज्ञान आणि वैराग्य यांनी भरलेली आहे. भक्तांना आनंद आणि प्रसन्नतेने आलेली विरक्ती त्यांना प्रिय आहे. आजघडीला कोणत्याही दत्तदेवस्थानात जा, तिथे कुत्री असतातच. ते शिर्डी असो वा अक्कलकोट, गाणगापूर असो वा दहा हजार पायऱ्या असणारे गिरनार किंवा कुरवपूर. शांतता पाळून विहरणारे कुत्रे आजूबाजूला भक्तांच्या आसपास आढळतात. कुत्र्यांजवळ गंधशक्ती, श्रवणशक्ती असते. त्यांचे माणसांशी हृदयाचे नाते असते. म्हणूनच गुह्याच्या शोधासाठी पोलीस श्वानांची मदत घेतात. शेपटी हलवून प्रेम व्यक्त करणारे श्वान दत्तप्रभूंना आवडतात. श्री दत्तप्रभुंजवळ गाय आहे. गाईजवळ थोडी मानवी भावना आहे, असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत. गाईला आपल्या मालकाचे हृद् गत कळते. दत्तसंप्रदायात भ्रमरकीटक न्याय प्रसिद्ध आहे. आपल्या 24 गुरूंमध्ये भ्रमराला दत्तगुरूंनी गुरू केले. भ्रमर एक साधारण कीटक उचलून आणतो. तो पळून जाऊ नये म्हणून त्याला दंश करून बेशुद्ध करतो. नंतर मातीच्या घरात त्याला बंदिस्त करून त्या भोवती गुणगुण करतो. भ्रमराचा दंश एवढा भयंकर असतो की कीटक त्याचे सतत ध्यान करतो. ध्यानामुळे एका साधारण कीटकाचे भ्रमरामध्ये रूपांतर होते. सद्गुरूंचे सतत ध्यान केल्याने एका सामान्य साधकाचे उच्च कोटीमध्ये रूपांतर होते. ‘आपणासारखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तयालागी’, असे संत तुकाराम महाराज सद्गुरूबद्दल म्हणतात. सद्गुरू सामान्य भक्ताचा जीवभाव मिटवून त्याला ब्रह्मभावाची प्राप्ती करून देतात. आपला ज्ञानवंश सद्गुरू अशा रीतीने पुढे नेतात.

श्री दत्तमहात्म्य या ग्रंथात विष्णुदत्त शर्मा यांची कथा आहे. माहूर येथे राहणारे विष्णुदत्त हे पवित्र आणि कर्मशूर गृहस्थ होते. त्यांची पत्नी सुशीला सात्विक होती. ते दोघे नित्य धर्माचरण करत. वैश्वदेव करून पिंपळवृक्षाखाली भूतबळी देत. ते उभयता दत्तोपासक होते. एक दिवस अचानक त्या पिंपळवृक्षाखाली ब्रह्मराक्षस प्रकटला. त्याला बघून विष्णुदत्ताला भय वाटले, तेव्हा तो राक्षस म्हणाला, घाबरू नकोस. तुझ्या घरचे अन्न सेवन करून मी संतुष्ट झालो आहे. तुला वरदान देण्यासाठी प्रकट झालो आहे. तुझी काय इच्छा आहे? यावर विष्णूदत्तांनी पत्नीच्या सांगण्यावरून श्री दत्तदर्शन मागितले. ती म्हणाली, ‘प्राणेश्वरा, मागू नका नश्वरा, श्री दत्ताची भेटी करा, ऐशा वरा मागावे’. श्री दत्तांचे दर्शन विष्णुदत्त व त्याच्या पत्नीला झाले. श्री दत्तप्रभूंनी दोघांवर संतुष्ट होऊन विष्णुदत्ताला परोपकारार्थ विद्या दिल्या. त्यांचा सदुपयोग करून विष्णुदत्त पत्नीसह मोक्षाला गेले. श्री दत्तप्रभूंना नि:स्वार्थ सेवा, त्याग आणि परोपकार हे गुण आवडतात. या गुणांची जोपासना करणाऱ्या भक्तांवर ते अलोट कृपा करतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.