महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

संत तुकारामांचे आत्मचरित्र

06:31 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संत तुकाराम यांचा जन्म महाराष्ट्रातील सध्याच्या पुणे जिल्ह्यातील देहू या गावात शके 1530 मध्ये वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. त्याच्या वडिलांचे नाव होते बोल्होबा आणि आईचे नाव होते कनकाई. त्यांना सावजी, तुकाराम आणि कान्होबा असे तीन पुत्र होते. संत तुकाराम आपल्या जीवनाचा पूर्वार्ध सांगताना म्हणतात. याति शूद्र वैश केला वेवसाव। आधी तो हा देव कुळपूज्य।।1।। नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुम्ही संतीं।।ध्रु.।। संवसारें जालों अतिदु:खें दुखी। मायबाप सेखीं कर्मलिया।।2।। दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान। स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली।।3।। लज्जा वाटे जीवा त्रासलों या दु:खें। वेवसाय देख  तुटी येतां।।4।। देवाचें देऊळ होतें तें भंगलें। चित्तासी जें आलें करावेंसें ।।5।। आरंभीं कीर्तन करीं एकादशी। नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं।।6।। कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियं।।7।। गाती पुढे त्यांचें धरावें धृपद। भावें चित्त शुद्ध करोनियां।।8।। संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊ दिली।।9।। ठाकला तो काहीं केला परउपकार। केलें हें शरीर कष्टवूनी।।10।। वचन मानिलें नाहीं सुहृदांची । समूळ  प्रपंचें वीट आला।।11।। सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही। मानियेलें नाहीं बहुमतां।।12।। मानियेला स्वप्नीं गुऊचा उपदेश। धरिला विश्वास दृढ नामी।।13।। यावरि या जाली कवित्वाची  स्फूर्ति। पाय धरिले चित्तीं विठोबाचे ।।14।। निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ।।15।। बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ।।16।। विस्तारीं सांगतां बहुत प्रकार।होईल उशीर आतां पुरे ।।17।। आतां आहे तैसा दिसतो विचार। पुढील प्रकार देव जाणे ।।18।। भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा। कृपावंत ऐसा कळों आलें।।19।। तुका म्हणे सर्व भांडवल। बोलविले बोल पांडुरंगें।।20।।

Advertisement

अर्थात ‘माझी जात शूद्र असून मी वाण्याचा व्यवसाय केला. माझ्या कुळात पूर्वीपासूनच श्रीकृष्ण हा पूज्य मानला गेला. खरे म्हणजे ही गोष्ट बोलण्यासारखी नाही पण तुम्ही वैष्णवांनी प्रश्न केला म्हणून सांगत आहे. संसाराच्या दु:खाने मी अति दु:खी झालो, अखेरीस माझे आईबापही निवर्तले (हे जग सोडून गेले) दुष्काळ पडल्यामुळे द्रव्य नाहीसे झाले, त्यामुळे समाजातील मानसन्मानही गेला. त्याचवेळी माझी पहिली पत्नी अन्न अन्न करीत मेली. या सर्व दु:खाने माझा जीव अतिशय त्रासून गेला व मला फारच लाज वाटू लागली. अशा अवस्थेत व्यवसायातही नुकसान होत राहिले. मग विठ्ठल रुक्मिणीचे देऊळ पडके झाले होते ते नीट करावे, अशी मनात इच्छा निर्माण झाली. प्रथम मी त्या देवळात एकादशी दिवशी कीर्तन करायला सुरुवात केली. पण कीर्तनाच्या अभ्यासात माझे लक्षच  लागत नव्हते. म्हणून विश्वासाने व आदराने काही संतांची वाक्ये पाठ केली... जे वैष्णव व संत कीर्तनात भगवंताचे गुणगान करीत असत, त्याच्या पाठीमागे उभे राहून शुद्ध चित्ताने धृपद म्हणत असे. मी वैष्णव भक्तांच्या चरणांचे तीर्थ सेवन केले. याबद्दल मनात कसलीही लाज येऊ दिली नाही. जमेल तेवढे उपकार मी दुसऱ्यावर केले आणि तसे करण्यातच माझे शरीर कष्टविले. मी माझ्या आप्त स्वकियांचे सांगणे कधीच मानले (ऐकले) नाही. मला प्रपंचाचा समूळ वीटच आला होता. सत्य असत्याबद्दल (खरे काय आणि खोटे काय?) मी माझ्या मनालाच साक्षी ठेवले आणि याबाबतीत अनेक मतांचा किंवा बहुमतांचा स्वीकार केला नाही. स्वप्नांमध्ये गुरुने केलेल्या उपदेशाचा स्वीकार करून हरिनामाच्या ठिकाणी

Advertisement

दृढ विश्वास ठेवला. यानंतर कविता करण्याची स्फूर्ती झाली व मी विठ्ठलाचे पाय माझ्या हृदयात घट्ट धरून ठेवले. नंतर मी शूद्र असूनसुद्धा वेदशास्त्रावर कविता लिहिल्या म्हणून रामेश्वरभट्टानी माझा निषेध करून त्या कवितांच्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडविल्या. त्यामुळे माझे मन दुखावले गेले. या पाण्यात बुडविलेल्या वह्यांसाठी मी तेरा दिवस उपोषण करीत धरणे धरून बसलो. यावेळी भगवान नारायणांनी वह्या पाण्यातून तारुन माझे समाधान केले. सविस्तर  हकिकत सांगण्यात पुष्कळ माहिती वाढेल व फारच उशीर होईल. म्हणून इथेच पुरे करतो. आताची स्थिती जी काही आहे ती स्पष्ट दिसतेच आहे. येथून पुढे काय होणार, ते त्या विठ्ठलालाच माहीत. भगवान नारायण माझ्यासारख्या भक्ताची उपेक्षा करणार नाही, तो कृपावंत आहे असे आम्हाला समजून आले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग हेच माझे सर्व भांडवल असून त्यानेच माझ्याकडून हे शब्द बोलविले.’

आणखी एका अभंगात आपले मन मोकळे करताना नम्रपणे म्हणतात ऐका वचन हें संत। मी तों आगळा पतित। काय काजें प्रीत। करीतासां आदरें।।1।। माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं। एकांचिये वांहीं। एक देखीं मानिती ।।ध्रु।।। बहु पीडिलों संसारें। मोडीं पीसें पिटीं ढोरें। न पडतां पुरें। या विचारें राहिलों।।2।। सहज सरलें होतें कांहीं। द्रव्य थोडें बहु तें ही। त्याग केला नाहीं। दिलें द्विजां याचकां।।3।।

प्रियापुत्रबंधु। यांचा तोडिला संबंधु । सहज जालों मंदु। भाग्यहीन करंटा।।4।। तोंड न दाखवावे जना। शिरें सांदी भरें राणां। एकांत तो जाणां। तयासाठी लागला ।।5।। पोटें पिटिले काहारें। दया नाहीं या विचारें। बोलावितां बरें। सहज म्हणें यासाठी ।।6।। सहज वडिलां होती सेवा। म्हणोनि पूजितों या देवा। तुका म्हणे भावा । साठी झणी घ्या कोणी।।7।। अर्थात ‘संतहो, मी तर पतित आणि पापी आहे, तरी पण कोणत्या कारणासाठी तुम्ही माझ्यावर आदर भावनेने  प्रेम करता हे मला कळत नाही. माझे म्हणणे तरी ऐका! माझे चित्तच मला साक्ष देते आहे की, मी खरोखरच भवसागरातून तरलो नाही. एक माझा आदर करतो म्हणून दुसरा करतो. संसारामुळे मी फारच पीडित झालो. शेतीच्या कामाच्या वेळी बैलांना मारले, त्यांच्या शेपट्या पिळल्या पण इतके सर्व करूनही संसारात मला काही पुरे पडले नाही. मग या परमार्थाच्या विचारानेच माझे मन स्थिर झाले. थोडे बहुत द्रव्य होते तेही संपून गेले. मी स्वत:हून ते द्रव्य ब्राह्मणांना किंवा याचकांना देऊन त्याचा त्याग केला नाही. पत्नी, मुले, भाऊ यांचा संबंध तोडून टाकला. साहजिकच मी भाग्यवान, मतिमंद, करंटाच झालो. लोकांना तोंड दाखवावेसे वाटेना म्हणून रानावनात एकांतात शांतपणे बसावे असे वाटत राहिले. पोटाच्या त्रासाने पीडित झालो, दयाभाव नाहीसा झाला कोणी जेवायला बोलावले तर बरे होईल, असे म्हणत राहिलो. तुकाराम महाराज म्हणतात, वाडवडिलांनी पांडुरंगाची सेवा केली म्हणून मी पण करीत आहे. त्यासाठी मी मोठ्या भक्तीभावाने पांडुरंगाची सेवा करतो असे कोणी समजू नये.’

अशा नम्र भावनेनेच वैष्णवांचा उपदेश साधक समजू शकतो. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये  सांगितल्याप्रमाणे अनुताप म्हणजे या भौतिक जगाची ‘दु:खालयं अशाश्वताम’ स्थिती जाणणे, ही भक्तिमार्गातील पहिली पायरी आहे. या पायरीवर उभा राहूनच नश्वर अशा जगापलीकडील वैकुंठाचे बद्ध जीवाला ज्ञान होते. एवढी संकटे आयुष्यात येऊनसुद्धा त्यांनी पांडुरंगाला आणि दैवाला कधी दोष दिला नाही. एका अभंगात आपल्या समोर येणारे जीवन कोणत्या भावनेत जगावे हे सांगताना म्हणतात. ‘जे आपल्या हातून निघून गेले आहे. त्याबद्दल कोणी मनातसुद्धा हळहळ व्यक्त करू नका. जे काही गेले ते भगवंताला पावले असे समजा, त्यामुळे भगवंताची सहज सेवा घडेल. आपल्या अंगातील त्रिगुणांची घाण शुद्ध करण्यासाठी व पूर्वकर्मे जाळण्यासाठी नारायणांनी अल्पशी शिक्षा भोगण्यास  दिली असे समजा. तुकाराम महाराज म्हणतात, असे बोलण्याला काही मोल पडत नाही, पण ही नम्रपणाची भावना भगवान श्रीकृष्णांना आवडते.’

-वृंदावनदास

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article