For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाची कसोटी मालिकेत विजयी सलामी

06:50 AM Feb 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाची कसोटी मालिकेत विजयी सलामी
Advertisement

लंकेचा एक डाव, 242 धावांनी पराभव, ख्वॉजा ‘सामनावीर’

Advertisement

वृत्तसंस्था / गॅले

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी बलाढ्या ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा पहिल्या सामन्यात एक डाव आणि 242 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात लंकेला फॉलोऑन स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या द्विशतकवीर उस्मान ख्वॉजाची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

Advertisement

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 154 षटकात 6 बाद 654 धावांवर घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा पहिला डाव 52.2 षटकात 165 धावांत आटोपला. लंकेने 5 बाद 136 या धावसंख्येवरुन शनिवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे पाच गडी 29 धावांत तंबूत परतले. चंडीमलने एकाकी लढत देत 9 चौकारांसह 72 तर कर्णधार डिसिल्वाने 3 चौकारांसह 22, कुशल मेंडीसने 1 षटकार आणि 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे कुहेनमनने 63 धावांत 5 तर लियॉनने 57 धावांत 3, स्टार्कने 13 धावांत 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 489 धावांची आघाडी मिळविल्याने त्यांनी लंकेला फॉलोऑन दिला.

फॉलोऑननंतर लंकेने दुसऱ्या डावात केवळ पराभव लांबविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. कुहेनमन आणि लियॉन यांच्या अचूक गोलंदाजीसमोर लंकेचा दुसरा डाव 54.3 षटकात 247 धावांत आटोपला. लंकेच्या दुसऱ्या डावात मॅथ्युजने 6 चौकारांसह 41, कर्णधार धनंजय डिसिल्वाने 8 चौकारांसह 39, कुशल मेंडीसने 4 चौकारांसह 34, व्हॅडेरसेने 47 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 53, चंडीमलने 3 चौकारांसह 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे कुहेनमनने 86 धावांत 4 तर लियॉनने 78 धावांत 4 तसेच स्टार्क आणि मर्फी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी लंकेचे 15 गडी बाद झाले. ऑस्ट्रेलियाने हा सामना एक दिवस बाकी ठेवून जिंकला. या सामन्यात कुहेनमनने 149 धावांत 9 गडी बाद केले.

आता या मालिकेतील दुसरा सामना येत्या गुरुवारपासून गॅलेमध्ये खेळविला जाणार असून लंकन संघामध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. लंकेने या पहिल्या कसोटीतील शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात 8 गडी तर उपाहारानंतर चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रात 7 गडी गमविले. ऑस्ट्रेलियाने हा सामना चहापानापूर्वीच जिंकला. कसोटी क्रिकेटमधील लंकेचा हा सर्वात मोठा पराभव आहे.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 154 षटकात 6 बाद 654, डाव घोषित, लंका प. डाव 52.2 षटकात सर्वबाद 165 (चंडीमल 72, डिसिल्वा 22, मेंडीस 21, कुहेनमन 5-63, लियॉन 3-57, स्टार्क 2-13), लंका दु. डाव 54.3 षटकात सर्वबाद 247 (व्हॅडेरसे 53, कुशल मेंडीस 34, धनंजय डिसिल्वा 39, कमिंदु मेंडीस 32, मॅथ्युज 41, चंडीमल 31, कुहेनमन 4-86, लियॉन 4-78, स्टार्क आणि मर्फी प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.