टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
विंडीजचा तीन गड्यांनी पराभव, मिचेल ओवेन ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / किंग्जस्टन
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण करणाऱ्या सामनावीर मिचेल ओवेनच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विंडीजचा तीन गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 8 बाद 189 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 18.5 षटकात 7 बाद 190 धावा जमवित आपला विजय नोंदविला.
विंडीजच्या डावामध्ये कर्णधार शाय होप आणि रॉस्टन चेस यांनी दमदार अर्धशतके झळकविताना दुसऱ्या गड्यासाठी 91 धावांची भागिदारी केली. सलामीच्या किंगने 12 चेंडूत 4 चौकारांसह 18 तर कर्णधार होपने 39 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 55, चेसने 32 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 60 तर हेटमायरने 19 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 38 धावा जमविल्या. विंडीजच्या डावामध्ये 9 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. विंडीजने पॉवरप्लेच्या 6 षटकात 56 धावा जमविताना 1 गडी गमविला. होप आणि चेस यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 30 चेंडूत नोंदविली. 10 षटकाअखेर विंडीजने 1 बाद 103 धावा जमविल्या होत्या. चेसने आपले अर्धशतक 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 25 चेंडूत तर हॉपने 3 षटकार आणि 4 चौकारांसह 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियातर्फे बेन ड्वारशुईसने 36 धावांत 4 तर अॅबॉट, कोनोली, इलीस आणि ओवेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये कॅमेरुन ग्रीन आणि मिचेल ओवेन यांनी अर्धशतके झळकविली. सलामीचा फलंदाज कर्णधार मिचेल मार्शने 17 चेंडूत 3 चौकारासह 23 धावा केल्या. मॅकगर्क केवळ 2 धावांवर बाद झाला. इंग्लीसने 8 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 18, मॅक्सवेलने 10 चेंडूत 2 चौकारांसह 11, कोनोलीने 8 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 13 धावा जमविल्या. ग्रीनने 26 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह 51 तर ओवेलने 27 चेंडूत 6 षटकारांसह 50 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियाने 18.5 षटकात 7 बाद 190 धावा जमवित या मालिकेत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 64 धावा जमविताना 2 गडी गमविले. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये 17 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाने 10 षटकाअखेर 4 बाद 97 धावा जमविल्या होत्या. विंडीजतर्फे होल्डर, अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 2 तर अकिल हुसेनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: विंडीज 20 षटकात 8 बाद 189 (चेस 60, हॉप 55, हेटमायर 38, किंग 18, ड्वारशुईस 4-36, अॅबॉट, कोनोली, इलीस, ओवेन प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 18.5 षटकात 7 बाद 190 (ग्रीन 51, ओsवेन 50, मार्श 24, इंग्लीस 18, मॅक्सवेल 11, कोनोली 13, अवांतर 11, होल्डर, अल्झारी जोसेफ व मोती प्रत्येकी 2 बळी, अकिल हुसेन 1-35)