ऑस्ट्रेलियाची टी-20 मालिकेत विजयी सलामी
दक्षिण आफ्रिकेचा 17 धावांनी पराभव, टीम डेव्हीड ‘सामनावीर’
वृतसंस्था/ डार्विन
‘सामनावीर’ टीम डेव्हिडच्या अर्धशतकाच्या जोरावर रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवून विजयी सलामी दिली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानाल प्रथम फलंदाजी दिली. ऑस्टेलियाचा डाव 20 षटकात 178 धावात आटोपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 161 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये टीम डेव्हिडने 52 चेंडूत 8 षटकार आणि 4 चौकारांसह 83 धावा जमवल्या. ग्रीनने 13 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 35 धावा केल्या. कर्णधार मार्शने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 13, ड्वेरहुईसने 19 चेंडूत 2 चौकारांसह 17, इलिसने 1 षटकार आणि 1 चौकारासह 12 धावा केल्या. ग्रीन आणि डेव्हिड यांनी चौथ्या गड्यासाठी 40 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात एकूण 13 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे मपेकाने 20 धावात 4, रबाडाने 29 धावात 2, एन्गिडी, लिनेडी आणि मुथूसॅमी यांनी प्रत्येक 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 71 धावा जमविताना 4 गडी गमविले. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 28 चेंडूत, शतक 67 चेंडूत तर दीड शतक 98 चेंडूत नोंदविले गेले. डेव्हिडने 29 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक पूर्ण करताना ड्वेरहुईस समवेत 7 व्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 34 चेंडूत नोंदविली. या जोडीने 59 धावांची भर घातली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावात सलामीच्या रिक्लेटॉनने 55 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकांसह 71, स्टब्जने 27 चेंडूत 5 चौकारांसह 37, कर्णधार मारक्रेमने 3 चौकांसह 12, प्रेटोरियसने 2 चौकारांसह 14 आणि रबाडाने 1 षटकारासह 10 धावा केल्या. द. आफ्रिकेच्या डावात 2 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 48 धावा जमविताना 3 गडी गमविले. द. आफ्रिकेचे अर्धशतक 38 चेंडूत तर शतक 74 चेंडूत आणि दीडशतक 111 चेंडूत नोंदविले गेले. रिक्लेटोन आणि स्टब्ज यांनी चौथ्या गड्यासाठी 72 धावांची भागिदारी केली. पण रिक्लेटोनचे अर्धशतक वाया गेले. ऑस्ट्रेलियातर्फे हॅजलवूड आणि ड्वेरहुईस यांनी प्रत्येक तीन तर झम्पाने दोन आणि मॅक्सवेलने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया 20 षटकात सर्वबाद 178 (डेव्हिड 83, ग्रीन 35, मार्श 13, ड्वेरहुईस 17, इलिस 12, अवांतर 12, मपेका 4-20, रबाडा 2-29, एन्गिडी, लिनेडी, मुथूसॅमी प्रत्येकी 1 बळी), दक्षिण आफ्रिका 20 षटकात 9 बाद 161 (रिक्लेटोन 71, स्टब्ज 37, मारक्रे 12, प्रेटोरियस 14, रबाडा 10. अवांतर 10, हॅजलवूड, ड्वेरहुईस प्रत्येकी 3 बळी, झम्पा 2-33, मॅक्सवेल 1- 29).
...