वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
सामनावीर ट्रेव्हिस हेडचे नाबाद दीडशतक, लाबुशेनचे नाबाद अर्धशतक, झाम्पाचे 3 बळी
वृत्तसंस्था / नॉटिंगहॅम
‘सामनावीर’ ट्रेव्हिस हेडच्या दमदार नाबाद दीडशतकाच्या जोरावर येथे खेळविण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा 7 गड्यांनी दणदणीत पराभव करुन विजयी सलामी दिली. वनडेतील ऑस्ट्रेलियाचा हा इंग्लंडवरील सलग 13 वा विजय आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा डाव 49.4 षटकात 315 धावांत आटोपला. इंग्लंड संघातील डकेट आणि जॅक्स यांनी शानदार अर्धशतके झळकविली. डकेटचे शतक 5 धावांनी हुकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 44 षटकात 3 बाद 317 धावा जमवित हा सामना 36 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी आरामात जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे श्रेय प्रामुख्याने हेड आणि लाबुशेन यांना द्यावे लागेल. या सामन्यात लाबुशेनने 39 धावांत 3 गडी बाद केले. आता या मालिकेतील दुसरा सामना हेडींग्ले येथे शनिवारी खेळविला जाणार आहे.
या पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या डावामध्ये डकेटने 91 चेंडूत 11 चौकारांसह 95 तर जॅक्सने 56 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 62, कर्णधार ब्रुकने 31 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 39, बेथेलने 34 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 35, स्मिथने 1 षटकार आणि चौकारांसह 23, लिव्हिंगस्टोनने 1 चौकारासह 13, सॉल्टने 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. सॉल्ट आणि डकेट यांनी सलामीच्या गड्यासाठी 48 धावांची भागिदारी केली. सॉल्ट बाद झाल्यानंतर डकेट आणि जॅक्स यांनी दुसऱ्या गड्यासाठी 120 धावांची भर घातली. जॅक्स बाद झाल्यानंतर डकेटने ब्रुकसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 45 धावांची भागिदारी केली. यानंतर इंग्लंडचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. इंग्लंडची एकवेळ स्थिती 3 बाद 213 अशी होती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर इंग्लंडचे शेवटचे 7 फलंदाज 102 धावांत तंबूत परतले. इंग्लंडच्या डावामध्ये 8 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे लाबुशेन आणि झंपा यांनी प्रत्येकी 3 तर हेडने 34 धावांत 2 गडी बाद केले. शॉर्ट आणि ड्वारशुईस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. चौथ्या षटकात इंग्लंडच्या पॉट्सने कर्णधार मार्शला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. हेड आणि स्मिथ यांनी सावध फलंदाजी करत दुसऱ्या गड्यासाठी 76 धावांची भागिदारी केली. लिव्हिंगस्टोनने स्मिथला स्वत:च्या गोलंदाजीवर टिपले. त्याने 28 चेंडूत 3 षटकारांसह 32 धावा जमविल्या. स्मिथ बाद झाल्यानंतर ग्रीनने हेडसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी केली. ग्रीनने 32 चेंडूत 5 चौकारांसह 32 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 26.1 षटकात 3 बाद 169 अशी होती.
हेडने लाबुशेनसमवेत चौथ्या गड्यासाठी जोरदार फटकेबाजी करीत अभेद्य 148 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला 6 षटके बाकी ठेवून शानदार विजय मिळवून दिला. हेडने 129 चेंडूत 5 षटकार आणि 20 चौकारांसह नाबाद 154 तर लाबुशेनने 61 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 77 धावा झळकविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 10 षटकार आणि 34 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 69 धावा जमविताना 1 गडी गमविला. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 2 गडी गमविताना 207 धावा केल्या. हेडने आपले अर्धशतक 1 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 50 चेंडूत तर शतक 92 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने झळकविले. हेडने आपले दीड शतक 123 चेंडूत 5 षटकार आणि 20 चौकारांच्या मदतीने झळकविले. डावखुऱ्या हेडचे हे वनडे क्रिकेटमधील सहावे शतक आहे. हेडचे यापुर्वीचे म्हणजे वनडेतील पाचवे शतक 10 महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात झळकविले होते. इंग्लंडच्या भूमीमध्ये ऑस्ट्रेलियातर्फे वनडे क्रिकेटमध्ये हेडची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हेडने 2022 नोव्हेंबर महिन्यात मेलबर्न येथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 152 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदविली होती.
संक्षिप्त धावफलक: इंग्लंड 49.4 षटकात सर्वबाद 315 (डकेट 95, जॅक्स 62, ब्रुक 39, स्मिथ 23, बेथेल 35, सॉल्ट 17, लिव्हिंगस्टोन 13, पॉटस नाबाद 11 अवांतर 14, लाबुशेन आणि झांपा प्रत्येकी 3 बळी, हेड 2-34, शॉर्ट व ड्वाशुईस प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 44 षटकात 3 बाद 317 (हेड नाबाद 154, मार्श 10, स्मिथ 32, ग्रीन 32, लाबुशेन नाबाद 77, अवांतर 12, पॉट्स, लिव्हिंगस्टोन, बेथेल प्रत्येकी 1 बळी)