ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी
दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा 72 धावांनी पराभव, पॅट कमिन्स सामनावीर, झाम्पाचे 4 बळी
वृत्तसंस्था/ ऑकलंड
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 72 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने फलंदाजीत 5 चौकारांसह 28 धावा जमवल्या. तर गोलंदाजी त्याने 19 धावात एक गडी बाद केला.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाचा डाव 19.5 षटकात 174 धावात आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 17 षटकात 102 धावात संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये सलामीच्या हेडने आक्रमक फलंदाजी करताना 22 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह 45 धावा झोडपल्या. स्टिव्ह स्मिथने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 11, कर्णधार मिचेल मार्शने 21 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 26, मॅक्सवेलने 1 षटकारासह 6, इंग्लिसने 1 चौकारासह 5, टीम डेव्हिडने 3 चौकारासह 17, कमिन्सने 22 चेंडूत 5 चौकारासह 28 धावा आणि इलिसने नाबाद 11 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडची गोलंदाजी शिस्तबद्ध नसल्याने ऑस्ट्रेलियाला अवांतराच्या रुपात 23 धावा मिळाल्या. त्यामध्ये 13 वाईड आणि एक नोबॉलचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या पॉवर प्लेदरम्यानच्या 6 षटकात 74 धावात जमवताना एक गडी गमवाला. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 24 चेंडूत, शतक 48 चेंडूत तर दीडशतक 100 चेंडूत फलकावर लागले. हेड आणि मार्श या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी 27 धावात झळकवली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 9 षटकार आणि 13 चौकार नोंदवले गेले. न्यूझीलंडतर्फे फर्ग्युसनने 12 धावात 4 तर मिल्ने, सीयर्स आणि सँटनर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. ग्लेन फिलिप्सने एकाकी लढत देत 35 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 42, क्लार्कसनने 13 चेंडूत 1 चौकाकारासह 10 तर बोल्टने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियातर्फे झम्पा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 34 धावात 4 तर इलिसने 16 धावात 2, हॅझलवूड, कमिन्स आणि मार्श यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 6 चौकार नोंदवले गेले. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ऑकलंडमध्ये येत्या रविवारी खेळवला जाणार आहे. पहिल्या पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात न्यूझीलंडने 27 धावा जमवताना 3 गडी गमवले. न्यूझीलंडचे अर्धशतक 56 चेंडूत तर शतक 94 चेंडूत नोंदवले गेले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 19.5 षटकात सर्वबाद 174 (हेड 45, स्मिथ 11, मार्श 26, डेव्हिड 17, कमिन्स 28, इलिस नाबाद 11, अवांतर 23, फर्ग्युसन 4-12, मिल्ने 2-40, सीयर्स 2-39, सँटेनर 2-35), न्यूझीलंड 17 षटकात सर्वबाद 102 (फिलिप्स 42, बोल्ट 16, क्लार्कसन 10, झाम्पा 4-34, इलिस 2-16, हॅझलवूड, कमिन्स, मार्श प्रत्येकी एक बळी).