ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडला मिळाले सुपर-8 चे तिकीट
इंग्लंडचा नामिबियावर तर कांगारुंचा स्कॉटलंडवर विजय
वृत्तसंस्था/ अँटिग्वा
टी 20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी ब गटात झालेल्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा पाच विकेटने धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर स्कॉटलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले तर इंग्लंडला सुपर 8 चे तिकीट मिळाले आहे. याआधी सकाळच्या सत्रात इंग्लंडने आपल्या अखेरच्या साखळी फेरीत नामिबियाचा 41 धावांनी पराभव केला. विजयानंतर इंग्लंड व स्कॉटलंडचे प्रत्येकी पाच गुण झाले, पण सरस नेटरनरेटच्या जोरावर इंग्लंडने सुपर-8 मध्ये स्थान मिळवले.
प्रारंभी, नामिबियाचा कर्णधार गेरार्ड इरास्मसने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण पावसाने हजेरी लावल्यामुळे सामना 11-11 षटकांचा करण्यात आला. यानंतर इंग्लंडच्या डावात पुन्हा पाऊस पडला आणि एक षटक कमी झाले. यामुळे सामना 10-10 षटकांचा खेळवण्या आला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांत 5 गडी गमावून 122 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरला भोपळाही फोडता आला नाही तर फिल सॉल्ट 11 धावा काढून बाद झाला. यानंतर जॉनी बेअरस्टो व हॅरी ब्रुक यांनी डाव सावरला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी साकारली. बेअरस्टोने 18 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. तर हॅरी ब्रुकने शानदार फलंदाजी करताना 20 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह नाबाद 47 धावा केल्या. बेअरस्टो बाद झाल्यानंतर मोईन अली 16 व लिव्हिंगस्टोनने 13 धावा करत ब्रुकला चांगली साथ दिली. यामुळे इंग्लंडला 122 धावापर्यंत मजल मारता आली.
नामिबियाचे पॅकअप
123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाची सुरुवात चांगली झाली. मायकेल व्हॅन लिगेन आणि निकोलस डेव्हिन यांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. सहाव्या षटकात डेव्हिनच्या विकेटसह नामिबियाला पहिला धक्का बसला. डेव्हिनने 18 धावा केल्या. लिगेनने 29 चेंडूत 33 धावांचे योगदान दिले खरे पण त्याला फटकेबाजी करता आली नाही. डेव्हिड विसने 27 धावा केल्या. नामिबियाच्या फलंदाजांना इंग्लंडइतकी आक्रमक फलंदाजी करता आली नाही, त्यांना 10 षटकांत 3 बाद 84 धावापर्यंत मजल मारता आली. इंग्लंडने हा सामना 41 धावांनी जिंकला.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 10 षटकांत 5 बाद 122 (फिल सॉल्ट 11, बेअरस्टो 31, हॅरी ब्रुक नाबाद 47, रुबेन ट्रम्पलमन 2 बळी)
नामिबिया 10 षटकांत 3 बाद 84 (मायकेल व्हॅन लिगेन 33, डेव्हिन 18, विस 27, जोफ्रा आर्चर व ख्रिस जॉर्डन प्रत्येकी एक बळी).
नामिबियाचा निकोलस डेव्हिन झाला रिटायर्ड आऊट,
टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच घटना
नामिबियाचा सलामीचा फलंदाज निकोलस डेव्हिन ‘रिटायर्ड आऊट‘ झाला. यासह त्याच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला गेला. डेव्हिन हा विश्वचषकात ‘रिटायर्ड आऊट‘ होणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाला मायकेल व्हॅन लिंगेन आणि निकोलस डेव्हिन या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. मात्र डेव्हिनला वेगाने धावा करता आल्या नाही. यामुळे त्याने ‘रिटायर्ड आऊट‘ होण्याचा निर्णय घेतला. तो 16 चेंडूत 18 धावा करून मैदानाच्या बाहेर गेला. यासह, टी 20 विश्वचषक स्पर्धेत निवृत्त होणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. आयसीसीचा ‘रिटायर्ड आऊट’ हा नियम पूर्णपणे वेगळा आहे. यामध्ये जेव्हा एखादा फलंदाज स्वत:हून किंवा कर्णधाराच्या इच्छेनुसार मैदानाबाहेर जातो, तेव्हा त्याला ‘रिटायर्ड आऊट‘ म्हटले जाते. ‘रिटायर्ड आऊट’ झालेला फलंदाज पुन्हा फलंदाजीला येऊ शकत नाही.
कांगारुंचा विजयी चौकार,स्कॉटलंडची झुंज अयशस्वी
सामनावीर स्टोइनिस : 29 चेंडूत 59 (ऑस्ट्रेलिया)
सेंट ल्युसिया, वेस्ट इंडिज : येथील डॅरेन सामी स्टेडियमवर झालेल्या ब गटातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 5 गड्यांनी पराभव केला. पराभवामुळे स्कॉटलंडचे सुपर-8 मध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. विशेष म्हणजे, स्कॉटलंडच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची केलेली धुलाई कौतुकाचा विषय ठरली. ब गटात ऑस्ट्रेलियाचा हा सलग चौथा विजय ठरला. 29 चेंडूत 59 धावांची खेळी करणारा स्टॉयनिस सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्कॉटलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मायकेल जोन्स 2 धावा काढून बाद झाला. यानंतर जॉर्ज मुनसे व ब्रँडन मॅकमुलेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. मुनसेने 35 धावा केल्या. मॅकमुलेनने शानदार फलंदाजी करताना 34 चेंडूमध्ये 60 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये त्याने दोन चौकार आणि सहा षटकार ठोकले. या खेळीदरम्यान त्याने 26 चेंडूत अर्धशतक ठोकले. स्कॉटलंडसाठी टी 20 वर्ल्डकपमध्ये वेगवान अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. मॅकमुलेन बाद झाल्यानंतर कर्णधार रिची बेरिंग्टनने 42 धावा करत संघाला 180 धावापर्यंत मजल मारुन दिली.
प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात आव्हान सहज पार केले. ऑस्ट्रेलियासाठी मार्कस स्टॉयनिस आणि ट्रेव्हिस हेड यांनी मॅच विनिंग खेळी केली. ट्रेव्हिस हेडने 49 चेंडूमध्ये 68 धावांचा पाऊस पाडला. तर मार्कस स्टॉयनिसने 29 चेंडूत 59 धावांची खेळी केली. याशिवाय टिम डेव्हिडने 24 धावांचे महत्वाचे योगदान दिले. डेव्हिड वॉर्नर, कर्णधार मिचेल मार्श व ग्लेन मॅक्सवेल या सामन्यात अपयशी ठरले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या या विजयाने मात्र स्कॉटलंडला स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला.