For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाचा किविजवर कसोटी मालिका विजय

06:55 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाचा किविजवर कसोटी मालिका विजय
Advertisement

मॅट हेन्री मालिकावीर, अॅलेक्स कॅरे सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च

बलाढ्या ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा एकतर्फी पराभव करत आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप गुणतक्त्यात न्यूझीलंडला मागे टाकत दुसरे स्थान मिळविले. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 3 गड्यांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला ‘मालिकावीर’ तर ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरेला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव 162 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 256 धावा जमवित 94 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 372 धावा जमवित आस्ट्रेलियाला 279 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाने 4 बाद 77 या धावसंख्येवरुन सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवसाला पुढे प्रारंभ केला. पण त्यांनी आपला पाचवा गडी लवकरच गमाविला. साऊदीने हेडला 18 धावांवर झेलबाद केले. ऑस्ट्रेलियन संघावर यावेळी चांगलेच दडपण आले होते. दरम्यान मिचेल मार्श आणि अॅलेक्स कॅरे या जोडीने आपल्या संघाला विजयाच्या समिप नेले. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 140 धावांची शतकी भागिदारी केली. सीयर्सने मार्शला पायचीत केले. त्याने 102 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 80 धावा झळकाविल्या. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 6 बाद 220 अशी होती. याच धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाने आणखी एक गडी गमाविला. सीयर्सने स्टार्कला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. अॅलेक्स कॅरेने कर्णधार पॅट कमिन्सच्या साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण करताना आठव्या गड्यासाठी अभेद्य 61 धावांची भागिदारी केली. कॅरेने 123 चेंडूत 15 चौकारांसह नाबाद 98 तर कर्णधार कमिन्सने 44 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 32 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे सीयर्सने 90 धावांत 4, मॅट हेन्रीने 94 धावांत 2 तर साऊदीने 1 गडी बाद केला.

सोमवारी येथे खेळ सुरु होण्यापूर्वी किरकोळ पावसाच्या सरी आल्याने मैदान आणि खेळपट्टी ओली होती. पंचांनी खेळपट्टी पूर्ण वाळल्यानंतर खेळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 5 बाद 174 धावा जमविल्या होत्या. त्यांनी खेळाच्या पहिल्या सत्रात 97 धावा जमविताना एकमेव गडी गमविला. मार्शने आपले अर्धशतक 64 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने झळकाविले. तर कॅरेने आपले अर्धशतक 60 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने नोंदविले. या जोडीने सहाव्या गड्यासाठी शतकी भागिदारी 124 चेंडूत नोंदविले. मार्श बाद झाल्यानंतर कॅरे आणि कमिन्स यांनी आठव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 58 चेंडूत नोंदविली.

ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकल्याने त्यांनी या मालिकेत महत्त्वाचे 12 गुण मिळविले. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया हा विद्यमान विजेता आहे. ऑस्ट्रेलियाने 12 सामन्यातून गुणांची टक्केवारी वाढविली आहे. त्यांची ही टक्केवारी 59.09 ते 62.50 अशी झाली आहे. न्यूझीलंडला ही मालिका एकतर्फी गमाविल्याने त्यांची गुणांची टक्केवारी 60 वरुन 50 अशी झाली आहे. न्यूझीलंडने अलिकडच्या कालावधीत 6 कसोटी सामने खेळले असून ते आता तिसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारतीय संघाने आपले आघाडीचे स्थान अधिक मजबूत करताना 68.51 गुणांची टक्केवारी राखली आहे.  भारताने अलिकडच्या कालावधीत 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडच्या दौऱ्यातील या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीबाबत कर्णधार कमिन्सने समाधान व्यक्त केले आहे.

संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड प. डाव 162, ऑस्ट्रेलिया प. डाव 256, न्यूझीलंड दु. डाव 108.2 षटकात सर्व बाद 372, ऑस्ट्रेलिया दु. डाव 65 षटकात 7 बाद 281 (कॅरे नाबाद 98, मिचेल मार्श 80, कमिन्स नाबाद 32, स्मिथ 9, ख्वॉजा 11, लाबुशेन 6, ग्रीन 5, हेड 18, अवांतर 22, सिरेस 4-90, हेन्री 2-94, साऊदी 1-39).

Advertisement
Tags :

.