ऑस्ट्रेलियाच्या टी-20 विश्वचषक संघ जाहीर
स्टीव्ह स्मिथला डच्चू, आयपीएल गाजविणाऱ्या फ्रेझर-मॅकगर्ककडेही दुर्लक्ष
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाचा टी-20 विश्वचषकासाठी प्राथमिक 15 सदस्यीय संघ जाहीर करताना अष्टपैलू मिचेल मार्शची औपचारिकपणे पूर्णवेळ कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली आहे, तर अनुभवी स्टीव्ह स्मिथला आणि युवा जेक फ्रेझर-मॅकगर्क यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि सध्याच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या स्मिथला विश्वचषकासाठीच्या संघातून वगळण्याची मागील दशकभरातील ही पहिलीच खेप आहे.
या 34 वर्षीय खेळाडूला सदर स्पर्धेत सलामीला जाण्याची अपेक्षा होती. परंतु निवड समितीने ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर आणि मार्श यांनाच सलामीवीर म्हणून पसंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आयपीएल करारही नसल्यामुळे स्मिथला काहीही फायदा झालेला नाही. यंदा आयपीएलमध्ये प्रभाव पाडलेल्या 22 वर्षीय फ्रेझर-मॅकगर्कने दिल्ली कॅपिटल्ससाठी 237.50 च्या आश्चर्यकारक स्ट्राइक रेटने 247 धावा जमवूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
निवड समितीने अष्टपैलू कॅमेरून ग्रीन आणि जोश इंग्लिस यांची निवड केली आहे. गेल्या वर्षभरापासून टी-20 संघाचा हंगामी कर्णधार म्हणून जबाबदारी पेलल्यानंतर आता 32 वर्षीय मार्शला अधिकृतपणे पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ऑक्टोबर, 2022 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळलेला असूनही डावखुरा फिरकीपटू अॅश्टन आगरला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे स्टॉइनिस, टिम डेव्हिड, ग्रीन व ग्लेन मॅक्सवेल यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात घेण्यात आले आहे.
संघ-मिचेल मार्श (कर्णधार), अॅश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा.