ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर सलग दुसरा विजय
वृत्तसंस्था/किंग्जस्टन
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत सामनावीर जोस इंग्लिस आणि कॅमेरुन ग्रीन यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात विंडीजच्या 8 गड्यांनी पराभव केला. विंडीजचा अष्टपैलू आंद्रे रसेलचा हा शेवटचा सामना होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 8 बाद 172 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 15.2 षटकात 2 बाद 173 धावा जमवित हा सामना 28 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी जिंकला. या मालिकेत आता ऑस्ट्रेलियाने विंडीजवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. विंडीजच्या डावात सलामीच्या किंगने 36 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 51 धावा जमविल्या. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या सामन्यात रसेलने 15 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने जलद 36 धावा झोडपल्या. विंडीजच्या शौकिनांना रसेलची ही शेवटची फटकेबाजी पहावयास मिळाली.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 20 षटकात 8 बाद 172 (किंग 51, आंद्रे रसेल 36, मोती नाबाद 18, हेटमायर 14, चेस 16, अवांतर 13, झाम्पा 3-29, मॅक्सवेल व इलीस प्रत्येकी 2 बळी, ड्वेरहुईस 1-37), ऑस्ट्रेलिया 15.2 षटकात 2 बाद 173 (इंग्लिस नाबाद 78, ग्रीन नाबाद 56, मार्श 21, मॅक्सवेल 12, होल्डर व अल्झारी जोसेफ प्रत्येकी 1 बळी)