ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 360 धावांनी दणदणीत विजय
स्टार्क, हेझलवूड, कमिन्सच्या वेगवान माऱ्यापुढे कोसळलेल्या पाकचा दुसरा डाव अवघ्या 89 धावांत खुर्दा
वृत्तसंस्था/ पर्थ
ऑस्ट्रेलियाने पर्थच्या खेळपट्टीवर पाकिस्तानचा दणदणीत पराभव करताना पहिल्या कसोटीत चार दिवसांतच 360 धावांनी विजय मिळवला. ही कसोटी नॅथन लिऑनसाठी जास्तच संस्मरणीय ठरली असून त्याने रविवारी 500 कसोटी बळींचा महत्त्वाचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियातील या सलग 15 व्या कसोटी पराभवाची नोंद करताना पाकिस्तानचा डाव चौथ्या दिवशी अंतिम सत्रात केवळ 89 धावांवर आटोपला. त्यापूर्वी यजमानांनी उपाहारानंतर अर्ध्या तासाने आपला दुसरा डाव 5 बाद 233 धावांवर घोषित करून पाकसमोर 450 धावांचे आव्हान ठेवले होते. .
मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्स यांच्या वेगवान माऱ्यापुढे पाकिस्तानची फलंदाजी पूर्ण कोसळली. चेंडू उसळणाऱ्या खेळपट्टीवर अनेक फलंदाजांना शरीरावर तडाखेही सहन करावे लागले. हेझलवूड आणि स्टार्क यांनी मिळून सहा बळी घेतले, तर कमिन्सचा चेंडू पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (14) याच्या बॅटची कड घेऊन गेला. पाहुण्यांकडे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीला काहीच उत्तर नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
पाकिस्तानची पहिल्या सात षटकांतच लक्ष्याचा पाठलाग करताना 3 बाद 17 अशी घसरण उडाली. सलामीवीर अब्दुल्ला शफीकला पहिल्याच षटकात झेलबाद करून स्टार्कने घरच्या मैदानावर 200 वा कसोटी बळी मिळवला. कर्णधार शान मसूद हेझलवूडच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी केवळ 2 धावा करू शकला, तर इमाम-उल-हकला स्टार्कने पायचित केले.
तत्पूर्वी, उस्मान ख्वाजाला शतक हुकून तो 90 धावांवर बाद झाला. उपाहारानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगाने धावा जमविण्याकडे कल राहून ख्वाजा आणि 63 धावांवर नाबाद राहिलेला मिचेल मार्श यांनी 126 चेंडूंत 126 धावांची भागीदारी केली. मार्शने त्याच्या घरच्या मैदानावर सलग दुसरे अर्धशतक झळकावले. रविवारच्या 2 बाद 84 वरून पुन्हा खेळण्यास सुऊवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसाच्या पहिल्या तासात स्टीव्हन स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडला गमावले. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी 26 पासून मेलबर्न येथे सुरू होईल, तर तिसरी कसोटी सिडनी येथे 3 ते 7 जानेवारीदरम्यान होणार आहे.
संक्षिप्त धावफलक-ऑस्ट्रेलिया पहिला डाव सर्व बाद 487, पाकिस्तान पहिला डाव सर्व बाद 271, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव (उस्मान ख्वाजा 90, स्टिव्ह स्मिथ 45, मिचेल मार्श 63, आफ्रिदी 1-76, शहजाद 3-45, जमाल 1-28), पाकिस्तान दुसरा डाव सौद शकील 24, बाबर आझम 14, इमाम-उल-हक 10, स्टार्क 3-31, हेझलवूड 3-13, कमिन्स 1-11, लिऑन 2-14).
लिऑन 500 बळी मिळविणारा तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज
फहीम अश्रफविऊद्धचे पायचितचे अपिल रेफरलसाठी गेल्यानंतर उचलून धरण्यात आले आणि लिऑनने 500 बळींचा टप्पा गाठला. तो शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा यांच्यानंतर 500 बळी घेणाऱ्या आठ खेळाडूंच्या विशेष क्लबमध्ये सामील होणारा तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. लियॉनने नंतर त्याच षटकात आमेर जमालला त्रिफळाचीत केले. त्याने त्याच्यासाठीच्या या संस्मरणीय कसोटी सामन्यात 18 धावा देऊन 2 बळी घेतले.