ऑस्ट्रेलियाची आज बांगलादेशशी लढत
वृत्तसंस्था/ पुणे
उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केल्यानंतर प्रबळ ऑस्ट्रेलियाचा संघ आज शनिवारी येथे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वी त्यांच्या साखळी फेरीतील अंतिम सामन्यात शाकिब अल हसनविरहीत बांगलादेशचा सामना करेल. यावेळी आपली विजयी घौडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. पाच वेळच्या या विजेत्यांनी गेल्या सहा लढतींमध्ये त्यांच्या मार्गात आलेल्या विविध संघांना नामोहरम करून दाखविलेले आहे. दुसरीकडे, बांगलादेश हा विद्यमान स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरलेला आहे.
ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध केलेल्या सर्वोत्तम एकदिवसीय खेळीच्या बळावर पॅट कमिन्सच्या संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर बांगलादेशने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याच्या आशा जिवंत ठेवल्या असून आंजेलो मॅथ्यूजच्या ’टाईम आऊट’मुळे गाजलेल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेवर तीन गडी राखून विजय मिळवला. यजमान पाकिस्तानसह अव्वल आठ संघ 2025 च्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील आणि आठव्या स्थानावर असलेला बांगलादेश गुणतालिकेतील अव्वल आठ संघांमधील आपले स्थान टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने आज विजय मिळविण्यासाठी आतुर असेल.
कर्णधार शाकिबने त्यांच्या मागील सामन्यात दोन बळी घेतले आणि त्यानंतर 65 चेंडूंत 82 धावा करून बांगलादेशला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून दिला. तथापि, डाव्या तर्जनीला फ्रॅक्चर झाल्याने तो बांगलादेशच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. यामुळे बांगलादेशची गोलंदाजी आणखी क्षीण झाली आहे. त्याच्या जागी अनामूल हकला अंतिम सामन्यासाठी बोलावण्यात आले असून नजमुल हुसेन शांतो हा कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. शांतो मागील सामन्यात 101 चेंडूंत 90 धावा करून फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविऊद्धच्या आतापर्यंतच्या 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 19-1 असे वर्चस्व गाजविलेले आहे.
संघ : बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटन दास, तनझिद हसन तमीम, तौहीद हृदोय, मुशफिकर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरिफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब, अनामूल हक.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, अॅश्टन आगर, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा, मिचेल स्टार्क.
सामन्याची वेळ : सकाळी 10.30 वा.