ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी तयारीला झटका
कमिन्स-हेझलवूड जखमी, स्टोइनिस निवृत्त
वृत्तसंस्था/ मेलबर्न-गॉल
कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड ही वेगवान गोलंदाजांची जोडी जखमी खेळाडूंच्या यादीत सामील झालेली असल्याने तसेच अष्टपैलू मार्कस स्टोइनिसने एकदिवसीय सामन्यांमधून धक्कादायकपणे निवृत्ती घेत आपले स्थान सोडले असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या काही दिवस आधी ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या तयारीवर परिणाम झालेला आहे.
आठ संघांची चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि ऑस्ट्रेलियाला 12 फेब्रुवारीपर्यंत 15 जणांच्या तात्पुरत्या संघात किमान चार बदल करावे लागतील. दुखापतग्रस्त खेळाडूंच्या गटात कमिन्स आणि हेझलवूड हे अष्टपैलू मिशेल मार्शला येऊन मिळालेले असताना दुसरीकडे, स्टोइनिसने गुऊवारी जाहीर केले की, तो यापुढे एकदिवसीय सामने खेळणार नाही. मात्र तो संघाला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उपलब्ध राहील.
भारताविऊद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेच्या अखेरीस झालेल्या पावलाच्या दुखापतीतून कमिन्स अद्याप सावरलेला नाही, तर हेझलवूड अजूनही पोटरीच्या दुखापतीतून बरा होत आहे. हेझलवूड शेवटची लढत भारताविरुद्धची ब्रिस्बेनमधील तिसरी अनिर्णीत राहिलेली कसोटी होती. चॅम्पियन्स ट्रॉफीला काही दिवस आधी राहिलेले असताना ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीला या गोंधळाला सामोरे जावे लागेल.
सुरक्षेच्या कारणास्तव भारत त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, तर ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचे मूळ यजमान असलेल्या पाकिस्तानमध्ये खेळेल. ‘दुर्दैवाने पॅट, जोश आणि मिच सततच्या दुखापतींमुळे त्रस्त आहेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ते वेळेवर उपलब्ध होऊ शकलेले नाहीत’, असे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी गॉल येथे सांगितले, जिथे संघ सध्या श्रीलंकेविऊद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ किंवा ट्रॅव्हिस हेड हे विद्यमान एकदिवसीय विश्वचषक विजेत्यांचे नेतृत्व करू शकतात.
ऑस्ट्रेलिया संघ 22 फेब्रुवारी रोजी लाहोर येथे आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडविऊद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेची सुऊवात करणार आहे, त्यानंतर दक्षिण आफ्रिका (25 फेब्रुवारी, रावळपिंडी) आणि अफगाणिस्तान (28 फेब्रुवारी, लाहोर) यांच्याशी त्यांच्या लढती होणार आहेत. कमिन्स आणि हेझलवूड हे दोघेही जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज असून आयसीसीच्या वरील मेगा स्पर्धेनंतर होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये ते सहभागी होऊ शकतील की नाही याविषयी शंका आहे.