फिरकीच्या जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स!
चौथा टी 20 सामना जिंकत टीम इंडियाची मालिकेत 2-1 ने आघाडी : अक्षर पटेल सामनावीर : वॉशिंग्टन सुंदरचे 3 बळी
वृत्तसंस्था/गोल्डकोस्ट
येथील कॅराराच्या मैदानात कांगारुंची शिकार करत 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने 167 धावा करत यजमान ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 119 धावांत ऑलआऊट झाला. भारतीय संघाने 48 धावांनी सामना जिंकत सलग दुस्रया विजयासह मालिकेत आघाडी घेतली आहे. उभय संघातील पाचवा व शेवटचा सामना दि. 8 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेन येथे होईल. सामन्यात अष्टपैलू खेळी साकारणाऱ्या अक्षर पटेलला सामनावी पुरस्काराने गौरवण्यात आले. गोल्ड कोस्ट येथील कॅराराच्या मैदानात भारतीय संघ प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.
कांगारुंची सुरुवात धमाकेदार पण शेवट खराब
168 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात मॅथ्यू शॉर्ट आणि मिचेल मार्श यांनी केली. दोघांनीही दमदार सुरुवात करून संघाला चांगली सुरूवात मिळवून दिली. मात्र, पाचव्या षटकात अक्षर पटेलने शॉर्टला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. शॉर्टने 2 चौकार आणि 2 षटकारासह 25 धावा केल्या. तर 9 व्या षटकात अक्षरने पुन्हा एकदा धक्का दिला आणि इंग्लिशला माघारी पाठवले. इंग्लिशला केवळ 12 धावा करता आल्या. यानंतर शिवम दुबेने कर्णधार मिचेल मार्श आऊट केले. मार्श 30 धावा करून बाद झाला. मग बाराव्या षटकात दुबेने टिम डेव्हिडलाही तंबूचा रस्ता दाखवला.
शिवम दुबेचा 117 मी लांब षटकार
चौथ्या टी 20 सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 व्या षटकात शिवम दुबेने अॅडम झम्पाच्या चेंडूवर 117 मीटर लांबीचा षटकार मारला. त्याच्या षटकारामुळे चेंडू हरवला आणि पंचांना दुसरा चेंडू मागवावा लागला. दुबेने झम्पाच्या ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू मारला आणि तो साईटक्रीनवर उडाला. त्यानंतर तिसऊrप् पंचांनी दुसरा चेंडू मागवला. दुबेच्या या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 8 बाद 167 (अभिषेक शर्मा 28, शुभमन गिल 46, शिवम दुबे 22, सूर्यकुमार यादव 20, अक्षर पटेल 11 चेंडूत नाबाद 21, नॅथन एलिस आणि झाम्पा प्रत्येकी 3 बळी) ऑस्ट्रेलिया 18.2 षटकांत सर्वबाद 119 (मिचेल मार्श 30, मॅथ्यू शॉर्ट 25, टीम डेव्हिड 14, स्टोइनिस 17, वॉशिंग्टन सुंदर 3 धावांत 3 बळी, अक्षर पटेल आणि शिवम दुबे प्रत्येकी 2 बळी).