ऑस्ट्रेलियन महिलांचा विजयारंभ
महिला वनडे विश्वचषक : न्यूझीलंडवर 89 धावांनी मात : सामनावीर अॅश्ले गार्डनरचे शतक
वृत्तसंस्था/ इंदोर
गतविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड महिला संघावर 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने अॅश्ले गार्डनरच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 327 धावांचे आव्हान ठेवले होते. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सोफी डीव्हाईन हीने न्यूझीलंडला जिंकवण्यासाठी पूर्ण जोर लावला. मात्र तिला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. परिणामी न्यूझीलंडचा डाव 237 धावांत आटोपला.
प्रारंभी, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अॅश्ले गार्डनरने शानदार शतकी खेळी साकारताना 83 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह सर्वाधिक 115 धावा केल्या. याशिवाय, फोबी लिचफिल्डने 45, किम गर्थने 38 आणि एलीस पेरीने 33 धावांचे योगदान दिले, त्यामुळे कांगारुंना सव्वातीनशेची मजल मारता आली. कर्णधार अॅलिसा हिलीला मात्र मोठी खेळी साकारता आली नाही.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सुझी बेट्सला भोपळाही फोडता आला नाही. दुसरी सलामीवीर जॉर्जियाही धावचीत होऊन शून्यावरच माघारी परतली. यानंतर अमेलिया केर आणि सोफी डिव्हाईन या दोघींनी 75 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, केर 33 धावा करुन बाद झाली. दुसरीकडे सोफीने मात्र 112 चेंडूचा सामना करताना 12 चौकार आणि 3 षटकारासह 111 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. पण, तिला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने न्यूझीलंडचा डाव 43.2 षटकांत 237 धावांत संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलियन महिला संघ 49.3 षटकांत सर्वबाद 326 (अॅश्ले गार्डनर 115, लिचफिल्ड 45, एलिस पेरी 33, किम गर्थ 38, जेस केर आणि लि ताहुहू प्रत्येकी 3 बळी).
न्यूझीलंड महिला संघ 43.2 षटकांत सर्वबाद 237 (सोफी डिव्हाईन 111, अमेलिया केर 33, इजाबेला गेझ 28, अॅनाबेल सदरलँड आणि सोफी मोलिन्यूक्स प्रत्येकी 3 बळी).
कांगारुंचा विजयी झंझावात कायम
दरम्यान, न्यूझीलंडला हा सामना जिंकून 8 वर्षांची मालिका खंडीत करण्यासह स्पर्धेत विजयी सलामी देण्याची संधी होती. मात्र कांगारुंनी तसे होऊ दिले नाही आणि किंवीविरुद्ध वनडेतील सलग 16 वा विजय मिळवला. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना हा फेब्रुवारी 2017 साली जिंकला होता.