ऑस्ट्रेलियन महिला संघाचा मालिका विजय
तीन सामन्यांची टी-20 मालिका, बेथ मुनी सामनावीर
वृत्तसंस्था/ माऊंट माँगेनेयु
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात सामनावीर बेथ मुनीच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर 82 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय असल्याने त्यांनी 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 3 बाद 204 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंडचा डाव 16.1 षटकात 122 धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात बेथ मुनीने 42 चेंडूत 11 चौकारांसह 70 धावा जमविताना व्हॉलसमवेत सलामीच्या गड्यासाठी 31 चेंडूत 57 धावांची भागिदारी केली. व्हॉलने 20 चेंडूत 7 चौकारांसह 36 धावा झळकाविल्या. व्हॉल बाद झाल्यानंतर लिचफिल्डने मुनीला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 69 धावांची भागिदारी 49 चेंडूत नोंदविली. लिचफिल्डने 29 चेंडूत 5 चौकारांसह 32 धावा केल्या. इलेसी पेरीने 15 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 29 तर सदरलँडने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 23 धावा जमविताना चौथ्या गड्यासाठी अभेद्य 44 धावांची भर घातली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 29 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे जेस केर, डिव्हाईन आणि अॅमेलिया केर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 67 धावा जमविताना 1 गडी गमाविला. मुनीने अर्धशतक 7 चौकारांसह 33 चेंडूत नोंदविले. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 28 चेंडूत, शतक 62 चेंडूत, दीडशतक 93 चेंडूत आणि द्विशतक 120 चेंडूत फलकावर लागले. 10 षटकाअखेर ऑस्ट्रेलियाने 1 बाद 99 धावा जमविल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. अॅमेलिया केरने एकाकी लढत देत 36 चेंडूत 4 चौकारांसह 40 तर ग्रीनने 18 चेंडूत 3 चौकारांसह 22, जेस केरने 3 चौकारांसह 14, कर्णधार बेट्सने 2 चौकारांसह 12 आणि प्लिमेरने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 14 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे सदरलँड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 8 धावांत 4 गडी बाद केले. तर किंगने 27 धावांत 3 तर ब्राऊनने 23 धावांत 2 गडी बाद केले. वेरहॅमने 1 बळी घेतला. न्यूझीलंडने पहिल्या 6 षटकात 45 धावा जमविताना 3 गडी गमाविले. न्यूझीलंडचे अर्धशतक 42 चेंडूत तर शतक 75 चेंडूत फलकावर लागले. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बाकी असून ऑस्ट्रेलियन महिला संघ न्यूझीलंडचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाला आहे.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया 20 षटकात 3 बाद 204 (बेथ मुनी 70, व्हॉल 36, लिचफिल्ड 32, पेरी नाबाद 29, सदरलँड नाबाद 23, अवांतर 14, जेस केर, अॅमेलिया केर, डिव्हाईन प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 16.1 षटकात सर्व बाद 122 (ग्रीन 22, अॅमेलिया केर 40, बेट्स 12, प्लिमेर 14, जेस केर 14, अवांतर 7, सदरलँड 4-8, किंग 3-27, ब्राऊन 2-23, वेरहॅम 1-15).