ऑस्ट्रेलियन महिला संघाची विजयी सलामी
भारतावर 6 गड्यांनी मात, सामनावीर लीचफील्ड, मॅकग्रा, पेरी यांची अर्धशतके
वृत्तसंस्था /मुंबई
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत गुरुवारी येथील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने यजमान भारताचा सहा गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फोबे लिचफिल्डला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सलग सहावा तसेच मायदेशातील सलग आठवा पराभव आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. जेमिमा रॉड्रिग्ज व पूजा वस्त्राकारच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकात 8 बाद 282 धावा जमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 46.3 षटकात 4 बाद 285 धावा जमवित आपला शानदार विजय नोंदवला.
भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 283 धावांचे आव्हान मिळाले. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या डावाला खराब सुरुवात झाली. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर रेणुका सिंग ठाकुरने कर्णधार अॅलिसा हिलीला खाते उघडण्यापूर्वी राणाकरवी झेलबाद केले. त्यानंतर लिचफिल्ड आणि एलीस पेरी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 25 षटकात 148 धावांची भागीदारी केली. दीप्ती शर्माने पेरीला वस्त्रकारकरवी झेलबाद केले. पेरीने 72 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारासह 75 धावा जमवल्या. स्नेह राणाने 31 व्या षटकात लिचफिल्डचा त्रिफळा उडवला. तिने 79 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 78 धावांचे योगदान दिले. नंतर बेथ मुनी आणि मॅकग्रा यांनी भारतीय गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत चौथ्या गड्यासाठी 88 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेले. वस्त्रकारच्या गोलंदाजीवर मुनीचा त्रिफळा उडाला. तिने 47 चेंडूत 4 चौकारासह 42 धावा जमवल्या. मॅकग्रा आणि गार्डनर यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मॅकग्राने 55 चेंडूत 11 चौकारासह नाबाद 68 तर गार्डनरने नाबाद 7 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाला अवांतराच्या रुपात 15 धावा मिळाल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 21 चेंडू बाकी ठेवून सहा गड्यांनी जिंकला.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 8 बाद 282 (यास्तिका भाटिया 49, रिचा घोष 21, जेमिमा रॉड्रिग्ज 82, दीप्ती शर्मा 21, पूजा वस्त्राकार नाबाद 62, गार्डनर, वेअरहॅम प्रत्येकी दोन बळी). ऑस्ट्रेलिया 46.3 षटकात 4 बाद 285 (हिली 0, लिचफिल्ड 1 षटकार आणि 8 चौकारासह 78, एलीस पेरी 72 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारासह 75, बेथ मुनी 47 चेंडूत 4 चौकारासह 42, मॅकग्रा 55 चेंडूत 11 चौकारासह नाबाद 68, गार्डनर नाबाद 7, अवांतर 15, रेणुका सिंग ठाकुर, पूजा वस्त्रकार, स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा प्रत्येकी एक बळी).