ऑस्ट्रेलियन महिला संघाची विजयी सलामी
इंग्लंड चार गड्यांनी पराभूत, अॅश्ले गार्डनर सामनावीर
वृत्तसंस्था/ सिडनी
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा 67 चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात फलंदाजीत नाबाद 42 तसेच गोलंदाजीत 19 धावांत 3 बळी आणि 2 झेल टिपणारी ऑस्ट्रेलियन संघातील अॅश्ले गार्डनरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडचा डाव 43.1 षटकात 204 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 38.5 षटकात 6 बाद 206 धावा जमवित विजय नोंदविला.
इंग्लंडच्या डावामध्ये कर्णधार नाईटने 48 चेंडूत 5 चौकारांसह 39, डॅनी वेट हॉजने 52 चेंडूत 3 चौकारांसह 38, अॅमी जोन्सने 30 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 31, नॅट सिव्हेर ब्रंटने 28 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19 तसेच ब्यूमाँटने 2 चौकारांसह 13 व इक्लेस्टोनने 2 चौकारांसह 16 धावा केल्या. इंग्लंडला 25 अवांतर धावा मिळाल्या. इंग्लंडच्या डावात 2 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे मेगन शूट, सुदरलँड आणि अॅलेना किंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर गार्डनरने 19 धावांत 3 बळी तसेच ब्राऊनने 21 धावांत 1 गडी बाद केला. इंग्लंडने पहिल्या पॉवर प्लेच्या 10 षटकात 45 धावा जमविताना 1 गडी गमाविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये कर्णधार हिलीने 78 चेंडूत 11 चौकारांसह 76 धावा जमवित संघात शानदार पुनरागमन केले. गार्डनरने 44 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 42, सुदरलँडने 2 चौकारांसह 10, बेथमुनीने 28 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 28, इलेसी पेरीने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. लिचफिल्ड 4 तर मॅकग्रा 2 धावांवर बाद झाल्या. अॅलेना किंग 2 चौकारांसह 11 धावांवर नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 2 षटकार आणि 27 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोन, फिलेर यांनी प्रत्येकी 2 तर बेल आणि डिन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या पॉवर प्ले दरम्यान 10 षटकात 53 धावा जमविताना 2 गडी गमाविले. हिलीने 53 चेंडूत 8 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक - इंग्लंड 43.1 षटकात सर्वबाद 204 (नॅट सिव्हेर ब्रंट 19, ब्यूमाँट 13, नाईट 39, हॉज 38, अॅमी जोन्स 31, इक्लेस्टोन 16, अवांतर 25, गार्डनर 3-19, गॅरेथ, सुदरलँड आणि किंग प्रत्येकी 2 बळी, ब्राऊन 1-21), ऑस्ट्रेलिया 38.5 षटकात 6 बाद 206 (अॅलिसा हिली 70, लिचफिल्ड 4, पेरी 14, बेथ मुनी 28, सुदरलँड 10, गार्डनर नाबाद 42, मॅकग्रा 2, किंग नाबाद 11, अवांतर 25, फिलेर आणि इक्लेस्टोन प्रत्येकी 2 बळी, बेल आणि डिन प्रत्येकी 1 बळी).