ऑस्ट्रेलियन महिला संघाची विजयी सलामी
न्यूझीलंडचा 8 गड्यांनी पराभव, बेथ मुनी ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / ऑकलंड
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ‘सामनावीर’ बेथ मुनीच्या शानदार नाबाद 75 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने यजमान न्यूझीलंडचा 39 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात फिरकी गोलंदाज अॅस्ले गार्डनरला दुखापत झाली.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 2 बाद 137 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 13.3 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले.
न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या कर्णधार बेट्सने 14 चेंडूत 3 चौकारांसह 14, प्लिमेरने 24 चेंडूत 4 चौकारांसह 27 धावा जमविल्या. न्यूझीलंडचे हे पहिले दोन फलंदाज 47 धावांत बाद झाल्यानंतर अॅमेलिया केर आणि सोफी डिव्हाईन यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 90 धावांची भागिदारी केली. केरने 46 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 51 तर डिव्हाईनने 36 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 39 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 17 चौकार नोंदविले गेले. पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडने 1 गडी गमविताना 40 धावा जमविल्या. न्यूझीलंडचे अर्धशतक 48 चेंडूत तर शतक 102 चेंडूत फलकावर लागले. केरने 44 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियातर्फे ब्राऊन आणि मॅकग्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावाला बेथ मुनी आणि व्हॉल यांनी दमदार सुरुवात केली. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 66 चेंडूत 123 धावांची शतकी भागिदारी केली. न्यूझीलंडच्या तेहुहूने व्हॉलला झेलबाद केले. तिने 31 चेंडूत 9 चौकारांसह 50 धावा जमविल्या. तेहुहूने लिचफिल्डला केवळ 2 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर मुनी आणि पेरी यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मुनीने 42 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 75 तर पेरीने नाबाद 3 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 77 धावा झोडपल्या. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 28 चेंडूत तर शतक 52 चेंडूत फलकावर लागले. मुनी आणि व्हॉल यांनी शतकी भागिदारी 52 चेंडूत नोंदविली. न्यूझीलंडतर्फे तेहुहूने 31 धावांत 2 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीचा हा 200 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. न्यूझीलंडच्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या गार्डनरला गोलंदाजी करताना दुखापत झाली. तिने केवळ 14 चेंडू टाकले. न्यूझीलंडच्या डावातील 17 व्या षटकात सोफी डिव्हाईन्सचा परतीचा जोरदार फटका झेलण्याच्या प्रयत्नात गार्डनरला ही दुखापत झाली. या दुखापतीनंतर तिने मैदान सोडले. गार्डनरच्या दुखापत स्थितीबाबत अद्याप समजू शकलेले नाही. ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलु गार्डनरने आतापर्यंत वनडे क्रिकेट प्रकारात फलंदाजीत 1411 धावा जमविल्या असून गोलंदाजीत 78 गडी बाद केले आहेत. मात्र या मालिकेतील उर्वरीत सामन्यात गार्डनर खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले. या मालिकेतील दुसरा सामना रविवार दि. 23 मार्च रोजी खेळविला जाईल.
संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड 20 षटकात 2 बाद 137 (अॅमेलिया केर नाबाद 51, डिव्हाईन नाबाद 39, प्लिमेर 27, बेट्स 14, अवांतर 6, ब्राऊन व मॅकग्रा प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 13.3 षटकात 2 बाद 138 (बेथ मुनी नाबाद 75, व्हॉल 50, लिचफिल्ड 2, पेरी नाबाद 3, अवांतर 8, ताहुहू 2-31)