ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचा डावाने विजय
वृत्तसंस्था/ पर्थ
यजमान ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने येथे खेळविण्यात आलेल्या एकमेव कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 264 धावांनी दणदणीत पराभव केला. उभय संघात ही एकमेव कसोटी ऑस्ट्रेलियाने खेळाच्या तिसऱ्या दिवशी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला मालिकावीर तर अॅनाबेल सदरलँडला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या एकमेव कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 76 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या ब्राऊनने 21 धावात 5 तर सदरलँडने 3 तसेच मॅकग्राने 2 गडी बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत 575 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 9 बाद 575 धावावर घोषित केला. अॅनाबेल सदरलँडने शानदार द्विशतक (210), कर्णधार हिलीने 99, बेथ मुनीने 78, गार्डनरने 65, गॅरेथने नाबाद 49 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे क्लास आणि ट्रायोन यांनी प्रत्येकी 3, डी क्लर्कने 2 आणि टकेरने 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेने 3 बाद 67 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 97.2 षटकात 215 धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात टकेरने 181 चेंडूत 7 चौकारांसह 64 तर ट्रायोनने 153 चेंडूत 10 चौकारांसह 64, ब्रिटसने 44 चौकारांसह 31 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे गॅरेथ, ब्राऊन, गार्डनर आणि सदरलँड यांनी प्रत्येकी 2 गडी तर पेरी आणि किंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील एकमेव कसोटीत त्यांना दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. या एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या सदरलँडने फलंदाजीत 210 धावा तर गोलंदाजीत 30 धावात 5 गडी बाद केले. बेथ मुनीने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 13 चौकारांसह 78 धावा झळकविल्या.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका प. डाव : 31.2 षटकात सर्वबाद 76, ऑस्ट्रेलिया प. डाव 125.2 षटकात 9 बाद 575 डाव घोषित (सदरलँड 210, हिली 99, मुनी 78, गार्डनर 65, गॅरेथ नाबाद 49), दक्षिण आफ्रिका दु. डाव 97.2 षटकात सर्वबाद 215 (टकेर 64, ट्रायोन 64, ब्रिटस 31, गॅरेथ, ब्राऊन, गार्डनर, सदरलँड प्रत्येकी 2 बळी, किंग, पेरी प्रत्येकी 1 बळी).