ऑस्ट्रेलियन महिलांकडून पाकचा धुव्वा
महिला टी-20 वर्ल्ड कप : उपांत्य फेरी निश्चित, गार्डनर सामनावीर
वृत्तसंस्था/ दुबई
विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे वर्चस्व राखत पाकिस्तान महिला संघाचा केवळ 82 धावा उडविल्यानंतर तब्बल 54 चेंडू बाकी ठेवत 9 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. 21 धावांत 4 बळी टिपणाऱ्या अॅश्ले गार्डनरला सामनावीराचा बहुमान मिळाला.
पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे ती मायदेशी परतली असून तिच्याशिवाय खेळताना पाक संघ झगडताना दिसला आणि त्यांचा डाव 19.5 षटकांत 82 धावांत आटोपला. अॅलीसा हिलीने नाणेफेक जिंकल्यानंतर पाकला प्रथम फलंदाजी दिली होती. हिलीनेच माफक धावसंख्येचा पाठलाग करताना आक्रमक फटकेबाजी केली. तिने 23 चेंडूत 37 धावा फटकावल्या. पण धावा घेताना पायात गोळे आल्याने तिला निवृत्त व्हावे लागले. तिच्या जागी आलेल्या एलीस पेरीने नंतर नाबाद 22 व गार्डनरने नाबाद 7 धावा जमवित विजयाचे सोपस्कार 11 व्या षटकात पूर्ण केले.
तीन सामन्यात तीन विजय मिळवित ऑस्ट्रेलियाने 2.786 असा भक्कम नेट रनरेट मिळविला आहे. त्यांनी नवव्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. पाक महिलांचा हा दुसरा पराभव असून त्यांच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. सहाव्या क्रमांकावरील आलिया रियाझने सर्वाधिक 26 धावा केल्या. संघाला केवळ 4 चौकार नोंदवता आल्यानंतर त्यांच्यात आक्रमकतेचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले.
ऑस्ट्रेलियन महिला संघालाही सुरुवातीला झटका बसला होता. वेगवान गोलंदाज टायला व्लाएमिन्कला मैदानात असताना खांद्याची दुखापत झाली. मात्र त्यांच्या आक्रमणात कोणतीही उणीव राहिली नाही. जॉर्जिया वेअरहॅमने 16 धावांत 2, अॅनाबेल सदरलँडने 15 धावांत 2 बळी टिपले. मेगन शूट महिलांच्या टी-20 इतिहासात सर्वाधिक बळी मिळविणारी गोलंदाज बनली असून तिने पाकच्या निदा दारला मागे टाकले आहे. या सामन्यात तिने 7 धावांत 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : पाक महिला संघ 19.5 षटकांत सर्व बाद 82 (आलिया रियाझ 26, गार्डनर 4-21), ऑस्ट्रेलिया महिला संघ 11 षटकांत 1 बाद 83 (अॅलीसा हिली 37, पेरी नाबाद 22).