ऑस्ट्रेलियन पंतप्रधान 62 व्या वर्षी विवाहबद्ध
पंतप्रधान असताना विवाह करणारे अल्बानीज पहिले नेते : अल्बानीज यांच्यापेक्षा पत्नी 16 वर्षांनी लहान
वृत्तसंस्था/ कॅनबेरा
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज शनिवारी आपली मैत्रिण जोडी हेडनशी विवाहबंधनात अडकले. अल्बानीज हे पदावर असताना लग्न करणारे पहिले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ठरले आहेत. 62 वर्षीय अल्बानीज यांनी कॅनबेरा येथील ‘द लॉज’ (अल्बानीज यांचे निवासस्थान) येथे एका खासगी समारंभात 46 वर्षीय जोडी हेडनशी विवाह केला. जोडी हेडन ह्या फायनान्शियल सर्व्हिसमध्ये काम करतात. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर ‘मॅरिड’ अशी पोस्ट करत आपल्या विवाहाची अधिकृत माहिती व्हायरल केली आहे. तसेच त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला असून त्यामध्ये ते वधूचा हात धरलेले दिसत आहेत.
जोडी हेडन यांच्याशी झालेले अल्बानीज यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांनी गेल्यावर्षी व्हॅलेंटाईन डेला हेडनला प्रपोज केले. तेव्हापासून त्यांचे लग्न चर्चेचा विषय बनले होते. गेल्यावर्षी अल्बानीज लग्न करणार असल्याची चर्चा होती, परंतु निवडणुकीमुळे ते पुढे ढकलण्यात आले. आता हे जोडपे दोन आठवड्यांच्या हनिमूनवर जाणार आहे. अल्बानीज सरकारमधील अनेक प्रमुख सदस्यांनी लग्नाला हजेरी लावली. यामध्ये कॅबिनेटमंत्री जिम चाल्मर्स, पेनी वोंग, केटी गॅलाघर, रिचर्ड मार्ल्स आणि अभिनेता रायस मुल्डून यांचा समावेश होता. हेडन यांची पाच वर्षांची भाची एला आणि त्यांचा भाऊ पॅट्रिक हे देखील लग्नाचे साक्षीदार होते. या विवाह सोहळ्यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे देशभरातून अभिनंदन होत आहे. अल्बानीज आणि हेडन सोमवार ते शुक्रवार ऑस्ट्रेलियात आपला हनिमून घालवतील. त्यांचा संपूर्ण खर्च त्यांच्या स्वत:च्या खिशातून होईल, म्हणजेच त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळणार नाही.
दोघांचेही दुसरे लग्न
ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांनी 2019 मध्ये त्यांची माजी पत्नी कार्मेल टेबट हिच्याशी घटस्फोट घेतला. या नात्यातून त्यांना एक मुलगा, नाथन आहे. अल्बानीज आणि हेडन 2020 मध्ये मेलबर्नमध्ये एका बिझनेस डिनरमध्ये भेटले होते. हे हेडनचेही हे दुसरे लग्न आहे. तथापि, हेडनच्या पहिल्या लग्नाची आणि घटस्फोटाची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. अल्बानीज यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या हेडन ह्या शिक्षिकेची मुलगी असून तिने स्वत: सेवानिवृत्ती उद्योगात चांगली प्रतिष्ठा मिळवली आहे.