For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस : इगा स्वायटेकची सलामीची लढत सोफिया केनिनशी

06:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस   इगा स्वायटेकची सलामीची लढत सोफिया केनिनशी
Advertisement

वृत्तसंस्था /मेलबर्न

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील येथे येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पोलंडची टॉप सिडेड महिला टेनिसपटू इगा स्वायटेकची पहिल्या फेरीतील सलामीची लढत सोफिया केनिनशी होणार आहे. दरम्यान दुसऱ्या फेरीत तिची लढत केर्बर किंवा डॅनिली कॉलिन्सबरोबर होण्याची शक्यता आहे. पुरूष विभागात  सर्बियाचा टॉप सिडेड नोव्हॅक जोकोविचची उपांत्यपूर्व फेरीची लढत ग्रीकच्या सित्सिपसशी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी जोकोविचला तिसऱ्या फेरीत ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेशी सामना करावा लागेल.

2020 साली या स्पर्धेत सोफिया केनिनने जेतेपद पटकाविले होते. यावेळी पोलंडच्या स्वायटेकला ड्रॉनुसार विजयासाठी निश्चितच झगडावे लागेल. 2016 साली ही स्पर्धा जिंकणाऱ्या जर्मनीच्या केर्बर किंवा डॅनियली कॉलिन्स यापैकी एका स्पर्धकाबरोबर स्वायटेकला दुसऱ्या फेरीत लढत द्यावी लागेल. सर्बियाच्या जोकोविचने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा 10 वेळेला जिंकली असून आता तो विक्रमी अकराव्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी ग्रीकच्या सित्सिपेसने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले होते. गुरूवारी या स्पर्धेचा ड्रॉ मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आला. महिलांच्या विभागात माजी विजेत्या जपानच्या नाओमी ओसाका, केर्बर आणि कॅरोलिन वोझ्नियाकी यांचे दिर्घ काळानंतर या स्पर्धेत पुनरागमन होत असून त्यांना पहिल्या फेरीत विजयासाठी झगडावे लागेल. जपानच्या ओसाकाने आतापर्यंत दोन वेळेला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम

Advertisement

स्पर्धा जिंकल्या असून तिची या स्पर्धेतील सलामीची लढत 16 व्या मानांकित कॅरोलिनी गार्सियाशी होणार आहे. अमेरिकेची कोको गॉफ हिचा गार्सियाच्या गटातच समावेश आहे. केर्बर आणि कॉलिन्स यांच्यात सलामीची लढत होणार आहे. स्वायटेकने 2022 साली उपांत्यफेरी गाठली आहे. वोझ्नियाकीने 2018 साली ही स्पर्धा जिंकली असून तिचा पहिल्या फेरीतील सामना मॅग्डा लिनेटशी होणार आहे. महिला एकेरीत स्वायटेक-व्होंड्रोसोव्हा, रिबकिना-पेगुला, साबालेंका-जेबॉर, गॉफ-सॅकेरी यांच्यात उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुरूष विभागात गेल्या वर्षी जोकोविच आणि सित्सिपेस यांच्यात जेतेपदासाठी चुरशीची लढत झाली होती. यावेळी पुन्हा त्यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडेल असे वाटते. सिनेर-रुबलेव्ह, अल्कारेज-व्हेरेव्ह, मेदव्हेदेव- रुने यांच्यात उपांत्यपूर्व फेरीच्या लढती अपेक्षित आहेत.

सुमीत नागल प्रमुख ड्रॉच्या समीप

या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू सुमीत नागलला पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यासाठी पात्र फेरीमध्ये आणखी एक सामना जिंकणे जरुरीचे आहे. गुरूवारी पात्र फेरीच्या स्पर्धेत सुमीत नागलने अंतिम फेरी गाठली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या विंटरचा 6-3, 6-2 असा पराभव केला. शुक्रवारी 26 वर्षीय सुमित नागलचा अंतिम सामना स्लोव्हाकियाच्या अॅलेक्स मॉक्लेनशी होणार आहे. 2021 नंतर प्रथमच सुमित नागल ग्रँडस्लॅम स्पर्धेतील प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवू शकेल. पण त्याला शुक्रवारचा अंतिम सामना जिंकणे आवश्यक आहे. नागलने 2019 आणि 2020 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉमध्ये तर 2021 साली ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते.

Advertisement
Tags :

.