ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बुमराहची धास्ती
वृत्तसंस्था/ पर्थ
भारताचा वेगवान गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचे अधिपत्य सांभाळणार असलेल्या जसप्रीत बुमराहची ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांनी भरपूर स्तुती केली आहे. सामना करणे अशक्य असा गोलंदाज अशा शब्दांत हेडने त्याचे वर्णन केले आहे, तर ब्रेट लीने ‘कॅट बर्गलर’ची उपमा त्याला दिली आहे.
बुमराहने आपले कौशल्य आणि धमक दाखवून माजी आणि सध्याच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आश्चर्यचकित केलेले आहे. 70 च्या दशकातील वेस्ट इंडिजच्या सुवर्णकाळापासून दौऱ्यावर आलेल्या कुठल्याच वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मनात बुमराहइतकी भीती निर्माण केली नाही, असे येथील स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियातील मागील दोन कसोटी मालिकांत 30 वर्षीय बुमराहने 21.25 च्या सरासरीने 32 बळी घेतले आहेत. त्यात एका सामना जिंकून देणाऱ्या कामगिरीचा समावेश आहे. 2018 च्या बॉक्सिंग डे कसोटीत ही कामगिरी करताना त्याने 33 धावांत 6 बळी टिपले होते. 20 व्या शतकाच्या सुऊवातीपासून रिचर्ड हॅडली आणि कर्टली अॅब्रोज या दोनच गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियात बुमराहहून कमी सरासरीने जास्त बळी घेतलेले आहेत. हेड, उस्मान ख्वाजा आणि स्टीव्हन स्मिथ या पाच सामन्यांच्या मालिकेत बुमराहचा सामना करण्यासाठी सज्ज असलेल्या वरच्या फळीतील सर्व फलंदाजांचे हा वेगवान गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावेल यावर एकमत आहे.
हेडने ‘फॉक्स क्रिकेट’शी बोलताना सांगितले आहे की, त्याचा सामना करणे अशक्य आहे. तुम्ही एक पाऊल पुढे आहात असे वाटण्यासाठी प्रयत्न करता, पण प्रत्यक्षात तोच एक पाऊल पुढे आहे, असे नेहमी वाटते. खेळाचे कोणतेही स्वरूप असू द्या, तो अविश्वसनीय आहे. तोच त्यांचा ‘एक्स-फॅक्टर’ आहे. बड्या क्षणी तुम्हाला मोठे खेळाडू हवे असतात आणि मला वाटते तोच त्यांचा सर्वांत मोठा खेळाडू आहे, असे त्याने म्हटले आहे.
बुमराहच्या गोलंदाजीची विचित्र शैली ख्वाजालाही बुचकळ्यात टाकल्याशिवाय राहिली नाही. जेव्हा मी पहिल्यांदा बुमराहचा सामना केला, तेव्हा मला असे वाटले होते की, अरे हा चेंडू आला कुठून ? त्याच्या विचित्र शैलीमुळे आणि तो चेंडू ज्या प्रकारे सोडतो त्यामुळे तो अपेक्षेपेक्षा थोडासा लवकर येतो, असे त्याने म्हटले आहे.