For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलिया युवा संघाचा 110 धावांनी विजय

06:00 AM Feb 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलिया युवा संघाचा 110 धावांनी विजय
Advertisement

19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

वृत्तसंस्था /किंबर्ले (द. आफ्रिका)

आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटातील पुरुषांच्या येथे सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर सिक्स फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियन युवा संघाने डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे इंग्लंडचा 110 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात शतक झळकवणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्युज वेबगेन सामनावीरचा मानकरी ठरला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 6 बाद 266 धावा जमवल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव सुरू होण्यापूर्वी पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी इंग्लंडला 24 षटकात विजयासाठी 215 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. मात्र इंग्लंडचा डाव 16.5 षटकात 104 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या डावात पहिल्याच षटकात सलामीचा फलंदाज कॉनस्टेस खाते उघडण्यापूर्वीच मॉर्गनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर डिक्सन कर्णधार वेबगेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 105 धावांची भागीदारी केली.  डिक्सनने 63 चेंडूत 6 चौकारासह 53 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा हरजेस सिंग केवळ एका धावेवर झेलबाद झाला. रियान हिक्सने 2 चौकारासह 19, टॉम कॅम्पबेलने 2 चौकारासह 13 धावा केल्या.

Advertisement

कर्णधार वेबगेनने 126 चेंडूत 15 चौकारासह 120 धावा जमवत तो सहाव्या गड्याच्या रुपात 48 व्या षटकात बाद झाला. ऑलिव्हर पीकेने 28 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 25 तर मॅकमिलनने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 19 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 30 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे विलीने 42 धावात 4 तर मॉर्गन आणि तझीम अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज झटपट बाद झाले. कर्णधार मॅकेनीने 10 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 22, थेनने 2 चौकारासह 13, हमझा शेखने 3 चौकारासह 14, अॅलीसनने 16 चेंडूत 3 षटकारासह 26 तर विलीने 1 चौकारासह 7 धावा जमवल्या. इंग्लंडच्या डावात चार फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. तसेच त्यांच्या डावात 1 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे कॅलम विडलेरने 29 धावात 4, मॅकमिलनने 16 धावात 3, स्ट्रेकरने 16 धावात 2, तर कॅम्पबेलने 19 धावात 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलिया 50 षटकात 6 बाद 266 (वेबगेन 120, डिक्सन 53, पीके नाबाद 25, मॅकमिलन नाबाद 19, हिक्स 19, कॅम्पबेल 13, अवांतर 16, विली 4-42, मॉर्गन, तझीम अली प्रत्येकी एक बळी)
  • इंग्लंड (विजयासाठी 24 षटकात 215 धावांचे उद्दिष्ट) 16.5 षटकात सर्वबाद 104 (मॅकेनी 22, थेन 13, हमझा शेख 14, अॅलीसन 26, अवांतर 9, विडलेर 4-29, मॅकमिलन 3-16, स्ट्रेकर 2-16, कॅम्पबेल 1-19).
Advertisement
Tags :

.