ऑस्ट्रेलियाने जिंकली वनडे मालिका
दुसऱ्या सामन्यातही कांगारूंचा दोन विकेट्सनी विजय : रोहित-श्रेयसच्या खेळी व्यर्थ : सामनावीर अॅडम झांपाचे चार बळी : शॉर्ट, कोनोलीची अर्धशतके
वृत्तसंस्था/अॅडलेड
गुरुवारी येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला दोन विकेट्सने पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात भारताला प्रतिष्ठेसाठी खेळावे लागणार आहे. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा सामना दिनांक 25 रोजी सिडनी येथे खेळवला जाईल. प्रारंभी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 50 षटकात 9 बाद 264 धावा केल्या. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य कांगारूंनी 46.2 षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. मॅथ्यू शॉर्ट, कूपर कोनोली यांनी शानदार अर्धशतके झळकावत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सामन्यात 60 धावांत 4 बळी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झाम्पाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संयमी सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी त्यांना सुरुवातीला मोठ्या धावा करण्यापासून बराचवेळ रोखले होते. अखेर 8 व्या षटकात कर्णधार मिचेल मार्शला अर्शदीप सिंगने 11 धावांवर बाद केले, त्यानंतर 13 व्या षटकात हर्षित राणाने ट्रॅव्हिस हेडचा मोठा अडथळा दूर केला. हेडने 40 चेंडूत 28 धावा केल्या. दोघे सलामीवीर बाद झाल्यानंतर मॅथ्यू रेनशॉ आणि मॅथ्यू शॉर्ट यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 100 धावांचा टप्पा पार केला. पण ही भागीदारी 22 व्या षटकात अक्षर पटेलने रेनशॉला 30 धावांवर त्रिफळाचीत करत तोडली. त्यानंतर अॅलेक्स कॅरीलाही वॉशिंग्टन सुंदरने 9 धावांवरच त्रिफळाचीत केले.
तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 264 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. शुभमन गिल केवळ 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीला पुन्हा एकदा भोपळाही फोडता आला नाही. पण रोहित शर्मा या गोष्टी शांतपणे पाहत होता. रोहितने संयत सुरुवात केली खरी, पण सेट झाल्यावर रोहितने दमदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. रोहित शर्माने यावेळी अर्धशतक झळकावले आणि संघाला सावरले. रोहितला यावेळी श्रेयस अय्यरची चांगली साथ मिळाली. रोहित आणि श्रेयस यांनी तिसऱ्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी रचली.
रोहित, श्रेयसची अर्धशतके
रोहित शतक झळकावणार, असे सर्वांना वाटत होते. पण मिचेल स्टार्कला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहितने आपली विकेट गमावली. त्याने 7 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 73 धावांची खेळी साकारली. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयसने आपले अर्धशतक झळकावले, पण तो मोठी खेळी साकारू शकला नाही. श्रेयसने 7 चौकारांच्या जोरावर 61 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर अक्षर पटेलने 41 चेंडूत 44 धावांची खेळी केली, तर हर्षित राणाने नाबाद 24 धावा केल्या. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने टीम इंडियाला 300 चा पल्ला गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने 4 विकेट्स घेतल्या, तर झेव्हियर बार्टलेटने 3, मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या.
हिटमॅन इज बॅक
रोहित शर्माने अॅडलेडमध्ये केवळ अर्धशतकच नाही, तर दोन मोठे ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले.
- ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1000 वनडे धावा
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
- रोहित शर्मा 1000 धावा (21 डाव)
- विराट कोहली 802 धावा (20 डाव)
- सचिन तेंडुलकर 740 धावा (25 डाव).
सलामीवीर म्हणून गांगुलीला टाकले मागे
रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने सौरभ गांगुली (9,146 धावा) यांना मागे टाकले.
सर्वाधिक धावा
- सचिन तेंडुलकर (15,310 धावा)
- रोहित शर्मा (9,147 धावा).
सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसरा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळीसह हिटमॅनने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी असून विराट कोहली दुसऱ्या तर आता रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. ही कामगिरी करताना त्याने सौरभ गांगुलीला मागे टाकले.
वनडेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय
- सचिन तेंडुलकर 18,426
- विराट कोहली 14,181
- रोहित शर्मा 11,249
- सौरभ गांगुली 11221.