ऑस्ट्रेलियाने जिंकली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी
सिडनी कसोटीत भारताला नमवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, टीम इंडियाची मात्र हॅट्ट्रिक हुकली
वृत्तसंस्था/ सिडनी
सिडनी कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सनी पराभव करत 3-1 असा मालिकाविजय मिळवला. या विजयासह कांगारुंनी दशकभरानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत टीम इंडियाला शह देत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली आहे. पाचव्या कसोटीतील पराभवामुळे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याची भारताची आशा संपुष्टात आली आहे. रविवारी, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला 162 धावांचे लक्ष्य दिले होते, जे ऑस्ट्रेलियन संघाने 4 विकेट गमावून पूर्ण केले. आता, लॉर्ड्सच्या मैदानात 11 जून रोजी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होईल.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांवर आटोपला. ज्यामुळे टीम इंडियाला चार धावांची अल्पआघाडी मिळाली. यानंतर भारताचा दुसरा डाव 157 धावांत आटोपला आणि कांगारुंना विजयासाठी 162 धावांचे टार्गेट मिळाले. प्रत्युत्तरात ऑसी संघाने ट्रॅव्हिस हेड (34) आणि वेबस्टर (39) यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर विजयावर शिक्कामोर्तब केले. मालिकेत 32 बळी घेणाऱ्या भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
बुमराहची कमी, ऑस्ट्रेलियासाठी ठरली विजयाची हमी
सिडनीतील शेवटच्या सामन्यात रविवारी टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या 157 धावांत आटोपला. पंत वगळता इतर टीम इंडियाचे सपशेल फेल ठरले. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात जडेजा व सुंदर बाद झाल्यानंतर इतर तळाचे फलंदाजही झटपट बाद झाले. ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 4 विकेट गमावून सहज गाठले. विशेष म्हणजे, टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करु शकला नाही. संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ बुमराहसमोर संघर्ष करताना दिसला. सिडनीचे मैदान गोलंदाजीला पोषक असल्याने ऑसी संघासमोरही कठीण आव्हान होते पण बुमराह दुसऱ्या डावात गोलंदाजीला उतरला नाही. याचा फायदा ऑसी संघाला झाला. उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर ट्रेव्हिस हेडने नाबाद 34, नवोदित वेबस्टरने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 3 तर सिराजने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 185 व दुसरा डाव 157
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 181 व दुसरा डाव 27 षटकांत 4 बाद 162 (कोन्स्टास 22, ख्वाजा 41, हेड नाबाद 34, वेबस्टर नाबाद 39, कृष्णा 3 बळी).
मालिकेत एकटा बुमराह चमकला, 32 बळीसह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी
बॉर्डर गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचा दबदबा पहायला मिळाला. या मालिकेत भारतीय फलंदाजाबरोबरच गोलंदाजांनीही निराशा केली. जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू होता, जो योद्ध्याप्रमाणे लढत राहिला. बुमराहने या मालिकेत चमकदार कामगिरी करत 32 विकेट घेतल्या. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनंही या मालिकेत 25 विकेट्स घेण्याबरोबरच 159 धावा केल्या. परंतु अप्रतिम कामगिरीसाठी बुमराहला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
पॅट कमिन्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी
बॉर्डर-गावसकर मालिकेत ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स बुमराहनंतर सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. कमिन्सने या मालिकेत 25 विकेट व 159 धावा केल्या. दरम्यान, पाचव्या व शेवटच्या कसोटीत त्याने 3 बळी घेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात 200 बळी घेणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉन तर भारताच्या आर अश्विनचा नंबर लागतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- पॅट कमिन्स - 200 विकेट्स
- नॅथन लायन - 196 विकेट्स
- रविचंद्रन अश्विन - 195 विकेट्स
- मिचेल स्टार्क - 165 विकेट्स.
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार फायनल
सिडनी कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयसीसी 2023-25 ची फायनल ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यात इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर 11 जूनपासून खेळवली जाईल. विशेष म्हणजे, द. आफ्रिकेने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे तर ऑस्ट्रेलियाने गतवेळी भारताचा पराभव करत जेतेपद पटकावले होते.
कांगारुंनी दशकभराचा दुष्काळ संपवला
ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात करताना भारताने पर्थ कसोटी 295 धावांनी जिंकली. यानंतर अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. गाबा येथे खेळवण्यात आलेली तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. शेवटचे दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकताच टीम इंडियाची बीजीटीमधील विजयी मालिका संपुष्टात आली. भारताने ही ट्रॉफी सलग चार वेळा जिंकली होती पण यावेळी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून मोठी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने 2014-15 मध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली होती. यानंतर टीम इंडियाने सलग 4 वेळा हे विजेतेपद पटकावले पण यावेळी त्याचे ट्रॉफी राखण्याचे स्वप्न भंगले.