For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला व्हाइटवॉश

06:58 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानला व्हाइटवॉश
Advertisement

वॉर्नरच्या कारकिर्दीचा सोनेरी शेवट, तिसऱ्या कसोटीत कांगारुंचा 8 गडी राखून विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला तिसऱ्या कसोटीत 8 विकेट्सनी पराभूत करत तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात विजयासाठी 130 धावांची गरज होती. हे आव्हान त्यांनी दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने 57 धावांची शानदार खेळी साकारली आणि क्रिकेट जगताचा निरोप घेतला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियात पाकिस्तानची पराभवाची मालिका कायम राहिली. 1995 पासून पाकिस्तानला एकही कसोटी ऑस्ट्रेलियन भूमीत जिंकता आलेली नाही. संपूर्ण मालिकेत 19 बळी घेणाऱ्या पॅट कमिन्सला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकने पहिल्या डावात 313 धावा केल्या होत्या. याचवेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 299 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे पाकिस्तानला 14 धावांची आघाडी मिळाली होती, मात्र दुसऱ्या डावात त्यांच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आणि संपूर्ण संघ 115 धावांतच गारद झाला. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य मिळाले. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 25.5 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले.

कांगारुंचा एकतर्फी विजय

प्रारंभी, पाकिस्तानने 7 बाद 68 धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. पण अवघ्या 47 धावांची भर घातल्यानंतर पाकिस्तानचा दुसरा डाव 43.1 षटकांत 115 धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद रिझवानने 28 तर आमेर जमालने 18 धावा केल्या. सईम आयुबने 33 धावांचे योगदान दिले. इतर खेळाडूंनी मात्र सपशेल निराशा केली. ऑस्ट्रेलियाकडून जोस हॅजलवूडने 4 तर नॅथन लियॉनने 3 विकेट घेतल्या. पाकचा डाव 115 धावांवर संपुष्टात आल्यानंतर कांगारुंना विजयासाठी 130 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर उस्मान ख्वाजा पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर आपली शेवटची कसोटी खेळत असलेला वॉर्नर व लाबुशेन यांनी 119 धावांची महत्वपूर्ण भागीदारी साकारत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. वॉर्नरने 7 चौकारासह 57 तर लाबुशेनने 9 चौकारासह नाबाद 62 धावा केल्या. अर्धशतकानंतर वॉर्नर लगेच बाद झाला. यानंतर लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ यांनी संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-0 फरकाने जिंकत वॉर्नरला अविस्मरणीय निरोप दिला. तत्पूर्वी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये, तर दुसरा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला गेला. या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला अनुक्रमे 360 आणि 79 धावांनी पराभूत केले होते.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान प.डाव 313 व दुसरा डाव 43.1 षटकांत सर्वबाद 115 (आयुब 33, रिझवान 28, आमेर जमाल 18, हॅजलवूड 16 धावांत 4 बळी, लियॉन 36 धावांत 3 बळी)

ऑस्ट्रेलिया प.डाव 299 व दुसरा डाव 25.1 षटकांत 2 बाद 130 (वॉर्नर 57, लाबुशेन नाबाद 62, स्मिथ नाबाद 4, साजीद खान दोन बळी).

वॉर्नरला विजयी निरोप, पाक संघाकडूनही खास भेट

वॉर्नरचे होम ग्राऊंड असलेल्या सिडनीत ऑस्ट्रेलियाने हा सामना 8 विकेट्सने जिंकला आणि वॉर्नरला अविस्मरणीय निरोप दिला. आपल्या शेवटच्या कसोटीत वॉर्नरने 34 आणि 57 धावांची खेळी केली. निरोपाचा सामना झाल्यानंतर पाकिस्तान संघाकडून दिग्गजाला खास भेट दिली गेली. पाकिस्तान संघाकडून बाबर आझमची जर्सी डेव्हिड वॉर्नरला भेट केली गेली. या जर्सीवर सर्व पाकिस्तानी खेळाडूंनी आपल्या स्वाक्षऱ्या केल्या होत्या. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद याने ही जर्सी वॉर्नरला दिली. तसेच वॉर्नर ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील एकमेव खेळाडू आहे, ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेट न खेळता थेट कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वॉर्नरने 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून, तो ऑस्ट्रेलियासाठी 112 सामने खेळला. यामध्ये त्याने 8786 धावा केल्या. कसोटी कारकिर्दीत वॉर्नरने 26 शतके आणि 37 अर्धशतके केली, तर तीन वेळा त्याने 200 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियात पाकचे लाजिरवाणे रेकॉर्ड अबाधित

पाकिस्तान संघाची लज्जास्पद कामगिरी ऑस्ट्रेलियात कायम राहिली. 1995 पासून पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकही कसोटी सामना जिंकू शकलेला नाही. 1995 मध्ये सिडनी येथे वसीम अक्रमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने शेवटची कसोटी जिंकली होती. 1995 नंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिकेत पाकिस्तानचा व्हाईटवॉश होण्याची ही सहावी वेळ आहे.

ऑस्ट्रेलियासाठी खेळणे हे स्वप्न

ऑस्ट्रेलियाकडून खेळणे हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मी पाकिस्तानविरुद्ध मालिकेत 3-0 च्या विजयासह निरोप घेतला, जे विलक्षणीय आहे. गेल्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली, अॅशेस मालिका बरोबरीत सोडवली आणि आयसीसी वनडे विश्वचषक जिंकला. येथे आम्ही पाकिस्तानविरुद्ध 3-0 असा विजय मिळवला, ही मोठी उपलब्धी आहे. या संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांच्यासोबत खेळणे सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या घरच्या माणसांसमोर निवृत्त होणे खूप खास आहे. संपूर्ण कारकिर्दीत दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, असे सामन्यानंतर वॉर्नर म्हणाला.

Advertisement
Tags :

.