ऑस्ट्रेलियाकडून यजमान लंकेचा व्हाईटवॉश
शेवटच्या कसोटीत 9 गड्यांनी विजय, स्टिव्ह स्मिथ ‘मालिकावीर’, अॅलेक्स कॅरे ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ गॅले
ऑस्ट्रेलियन संघाने तब्बल 14 वर्षांनंतर लंकेमध्ये पहिली कसोटी मालिका एकतर्फी जिंकली. रविवारी येथे झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात खेळाच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने लंकेचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. कर्णधार स्टिव्ह स्मिथला ‘मालिकावीर’ तर अॅलेक्स कॅरेला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने केवळ दोन दिवसात जिंकली होती. या दुसऱ्या कसोटीत लंकेने पहिल्या डावात 257 धावा जमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 414 धावा जमवित 157 धावांची भक्कम आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरे यांनी दमदार शतके झळकावित द्विशतकी भागिदारी केली. लंकेने 8 बाद 211 या धावसंख्येवरुन रविवारी खेळाच्या चौथ्या दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 2 गडी 20 धावांची भर घालत तंबूत परतले. लंकेचा दुसरा डाव 68.1 षटकात 231 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजयासाठी 75 धावांची गरज होती आणि त्यांनी 17.4 षटकात 1 बाद 75 धावा जमवित विजय नोंदविला. हा सामना उपहारापूर्वीच समाप्त झाला.
लंकेच्या दुसऱ्या डावात मॅथ्यूजने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 73, कुशल मेंडीसने 1 षटकार आणि 5 चौकरांसह 50, कर्णधार डिस्लिव्हाने 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे लायन आणि कुहेनमन यांनी प्रत्येकी 4 तसेच वेबस्टरने 2 गडी बाद केले. या सामन्यात कुहेनमन आणि लायन यांनी प्रत्येकी 7 बळी मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सलामीचा हेड जयसूर्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 23 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. ख्वाजा आणि लाबूशेन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. ख्वॉजा 3 चौकारांसह 27 तर लाबूशेन 4 चौकारांसह 26 धावांवर नाबाद राहिले.
ऑस्ट्रेलियन संघाने यापूर्वी म्हणजे 2011 साली लंकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व पाँटींगकडे होते. पाँटींगच्या ऑस्ट्रेलियन संघाने ही मालिका 1-0 अशी जिंकली होती. दरम्यान 2016 साली ऑस्ट्रेलियाला लंकेकडून 0-3 असा एकतर्फी पराभव कसोटी मालिकेत स्वीकारावा लागला होता. 2022 साली उभय संघातील झालेली कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियन संघाला स्टिव्ह स्मिथने 2025 ची मालिका एकतर्फी जिंकून दिली. आता आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत जून महिन्यात लॉर्डस् मैदानावर विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. लंकन संघाला सलग अलिकडच्या कालावधीत चौथा पराभव स्वीकारावा लागल्याने ते विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर आहेत.
संक्षिप्त धावफलक - लंका प. डाव 257, ऑस्ट्रेलिया प. डाव 414, लंका दु. डाव 68.1 षटकात सर्वबाद 231 (मॅथ्यूज 76, कुशल मेंडीस 50, डिस्लिव्हा 23, अवांतर 15, कुहेनमन आणि लायन प्रत्येकी 4 बळी, वेबस्टर 2-6), ऑस्ट्रेलिया दु. डाव 17.4 षटकात 1 बाद 75 (ख्वाजा नाबाद 27, लाबूशेन नाबाद 26, हेड 20, अवांतर 2, जयसूर्या 1-20).