ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज दक्षिण आफ्रिका
‘चोकर्स’चा शिक्का पुसण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ कोलकाता
विश्वचषक स्पर्धेत आज गुरुवारी येथे होणार असलेल्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार असून टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघ त्यांना लागलेला ‘चोकर्स’चा शिक्का पुसून टाकण्याचा प्रयत्न यावेळी करेल. दुसऱ्या बाजूने, एकदिवसीय विश्वविजेतेपदाचा वारसा कायम ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाला प्रयत्न राहील.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 12 पैकी पाच स्पर्धा जिंकलेल्या असून त्यापैकी चार विजेतेपदांची नोंद गेल्या सहा स्पर्धांमध्ये झालेली आहे. महत्त्वाच्या क्षणी मोठी उसळी घेण्यासाठी ते ओळखले जातात. याउलट नऊ स्पर्धांत चार वेळा उपांत्य फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेला या टप्प्याच्या पलीकडे कधी जाता आलेले नाही. पण यावेळी उपांत्य फेरीत प्रवेश करताना दक्षिण आफ्रिकेने जो जोश दाखवला आहे तो पाहता ते इतिहास बदलण्याच्या तयारीत आहेत.
याच मैदानावर भारताविऊद्ध डाव 83 वर संपुष्टात आला असला आणि नेदरलँड्सविऊद्ध पराभव पत्करावा लागलेला असला, तरी दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी फॉर्मात राहिली आहे. त्यांच्या सुरुवातीच्या सहापैकी चार फलंदाजांनी शतके झळकावली असून क्विंटन डी कॉकच्या नावावर चार शतके आणि 591 धावा आहेत. रॅसी व्हॅन डर डुसेनने तिसऱ्या क्रमांकावर स्थिरता प्रदान केलेली आहे, तर फिरकीसाठी अनुकूल परिस्थितीत हेन्रिक क्लासेनने सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. एडन मार्करमनेही धडाकेबाज पद्धतीने फिनिशिंग केलेले आहे.
दक्षिण आफ्रिकेने सहा वेळा 300 च्या पुढे जाण्यात यश मिळविले आहे आणि विश्वचषकातील सर्वाधिक 5 बाद 428 धावसंख्या श्रीलंकेविरुद्ध नोंदविलेली आहे. त्यांच्या केवळ डेव्हिड मिलरलाच मर्यादित संधी मिळाल्या आहेत, तर बावुमा हा फलंदाजीतील एकमेव कमकुवत दुवा राहिलेला आहे. धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरणारा बावुमा पुरेसा तंदुरुस्त न झाल्यास त्याच्या जागी रीझा हेन्ड्रिक्सची निवड होण्याची शक्यता आहे, जो डी कॉकसह सलामीला येईल. गोलंदाजीत डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जेनसेन लुंगी एनगिडीसह नवीन चेंडू हाताळताना संघाला लवकर यश मिळवून देऊ पाहील. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू केशव महाराज आणि तबरेझ शम्सी माऱ्याची जबाबदारी सांभाळतील.
लक्ष्याचा पाठलाग करताना आपले दोन्ही सामने गमावलेला दक्षिण आफ्रिका नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळेल अशी आशा बाळगून असेल. कारण त्यांनी या स्पर्धेत विशेष कामगिरी प्रथम फलंदाजी करतानाच केली आहे. दुसरीकडे, भारत व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सलग सात विजय मिळविलेले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅक्सवेलच्या नाबाद 201 धावांच्या खेळीने त्यांना आवश्यक प्रेरणा दिलेली आहे. धोंडशिरेच्या दुखापतीमुळे मॅक्सवेल गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात खेळू शकलेला नसला, तरी तो आज अष्टपैलू स्टॉइनिसच्या जागी परतण्याची शक्यता आहे.
याशिवाय अनुभवी डेव्हिड वॉर्नर फॉर्मात असून त्याने पाकिस्तान व नेदरलँड्सविऊद्ध लागोपाठ शतके झळकावलेली आहेत. डावखुऱ्या ट्रॅव्हिस हेडने न्यूझीलंडविऊद्ध 109 धावा करत शानदार पुनरागमन केलेले असले, तरी तो मागील तीन सामन्यांत प्रभाव पाडू शकलेला नाही. 426 धावा जमविलेला मिचेल मार्श मात्र त्यांच्या फलंदाजीचा कणा बनलेला असून तो आणि मॅक्सवेल म्हणजे त्यांना मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचविण्याची गुऊकिल्ली आहे. अनुभवी स्टीव्ह स्मिथलाही आज फॉर्म गवसेल अशी आशा ऑस्ट्रेलिया बाळगून असेल.
संघ : दक्षिण आफ्रिका-टेम्बा बवुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेन्रिक क्लासेन, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसेन आणि लिझाद विल्यम्स.
ऑस्ट्रेलिया-पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, अॅश्टन आगर, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा आणि मिचेल स्टार्क.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.