ऑस्ट्रेलिया टुडे आऊटलेटवर बंदी
जयशंकर यांना प्रसिद्धी दिल्याने कॅनडाची कृती
वृत्तसंस्था
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची पत्रकार परिषद आयोजित केल्याने आणि या पत्रकार परिषदेला प्रसिद्धी दिल्याने कॅनडाने ‘ऑस्ट्रेलिया टुडे’ या प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या आऊटलेटवर बंदी घातली आहे. भारताने या कृतीचा निषेध केला असून ही कृती दांभिकपणाची असल्याची जोरदार टीका केली आहे. कॅनडा देश नेहमी विचारस्वातंत्र्याचा नगारा बडवत असतो. तथापि, स्वत:च्या देशात मात्र तो विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य विशिष्ट समुदायांना नाकारतो. कॅनडाची ही कृती त्याची दांभिकता सिद्ध करणारी आहे. अशाप्रकारे कॅनडा त्याची बाजू समर्थनीय ठरवू शकत नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे.
जयशंकर यांची टीका
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी या पत्रकार परिषदेत कॅनडाच्या संदर्भातील भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली होती. कोणताही पुरावा नसताना कॅनडाने भारतावर आरोप केले आहेत. कॅनडात खलिस्तानवादी दहशतवाद्यांना मोकळे रान मिळते. त्यांच्यावर बंदी घालण्याऐवजी हा देश भारतावरच बिनबुडाचे आरोप करतो. हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानवादी दहशतवाद्याची कॅनडात हत्या करण्यात आली होती. या हत्येचे खापर हा देश भारतावर फोडत आहे. या हत्येत भारताचा हात असल्याचे त्याचे म्हणणे आहे. मात्र, हा धडधडीत खोटा आरोप असून भारताने लगोलग तो फेटाळला आहे. कॅनडाकडे भारताने पुराव्याची मागणी अनेकदा केली होती. मात्र, आजवर त्या देशाने एकही ठोस पुरावा सादर केलेला नाही. त्या देशाने भारतावर केलेले आरोप किती बिनबुडाचे आहे, हे या कृतीवरुन दिसते. अशी अर्थाची अनेक विधाने करत जयशंकर यांनी त्या पत्रकार परिषदेत भारताची बाजू स्पष्ट केली होती.
सुरक्षेचा प्रश्न
कॅनडात भारताच्या उच्चायोग अधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा मिळत नाही. ही बाब गंभीर आहे. आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार त्यांना सुरक्षा मिळणे आवश्यक आहे. कॅनडाचे सरकार त्याच्या राजकीय स्वार्थासाठी भारताच्या हितांना धक्का लावत आहे, अशा अर्थाची टीकाही जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत केली होती.
वाँग यांचाही सहभाग
या पत्रकार परिषदेत ऑस्टेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वाँग यांचाही सहभाग होता. त्यांनीही भारत-कॅनडा संबंधातील प्रश्नांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही कॅनडाच्या आरोपांच्या संदर्भात आणि त्या देशात चाललेल्या तपासासंदर्भात आमची चिंता व्यक्त केली आहे. भारतालाही आम्ही आमची भूमिका कळविली आहे. कॅनडाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असे वक्तव्य वाँग यांनी या पत्रकार परिषदेत केले होते.