ऑस्ट्रेलियाकडून विंडीजचा धुव्वा
चौथा टी 20 सामनाही विंडीजने गमावला : कांगारुंची मालिकेत 4-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/ बसारेटे
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा टी-20 सामना तीन विकेट्सने जिंकला. यासह, कांगारुंनी पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. सलग चौथ्या टी-20 विजयात कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिश आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मॅक्सवेलने 18 चेंडूत जलद 47 धावा केल्या. या अद्भुत खेळीसाठी मॅक्सवेलला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
सेंट किट्समध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने 9 विकेट्स गमावत 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकांत 206 धावांचे लक्ष्य गाठले. यासह ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठून टीम इंडियाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाची विजयी धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात राहिली. कर्णधार मिचेल मार्श डावातील दुसऱ्याच बॉलवर भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यानंतर मॅक्सवेलने जोश इंग्लिस याच्यासह दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. जोश इंग्लिसच्या रुपात ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका लागला. जोशने 30 चेंडूत 51 धावा केल्या. जोश आऊट झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरॉन ग्रीन या ऑलराउंडर जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 63 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर मॅक्सवेलच्या खेळीचा शेवट झाला. मॅक्सवेलने 18 बॉलमध्ये 47 धावा चोपल्या. मॅक्सवेलने या खेळीत 1 चौकार आणि 6 षटकार लगावले. मॅक्सवेलनंतर विंडीजने ऑस्ट्रेलियाला झटपट 2 झटके देत सामन्यात कमबॅक केले. मिचेल ओवेन 2 धावांवर बाद झाला. तर कूपर कोनोलीला भोपळाही फोडता आला नाही. मात्र कॅमेरॉन ग्रीनने अॅरॉन हार्डी आणि झेव्हीयर बार्टलेट या दोघांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहोचवले. ग्रीनने 35 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 55 धावा केल्या. कांगारुंनी विजयी लक्ष्य 19.2 षटकांत पूर्ण करत सलग चौथा विजय मिळवला.
विंडीजची पराभवाची मालिका कायम
प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजची सुरुवात खराब झाली. ब्रेडॉन किंग 18 धावा करुन बाद झाला. कर्णधार शाय होपला (10) अपेक्षित कामगिरी करता आली नाही. विंडीजकडून रुदरफोर्डने सर्वाधिक 31 धावांचे योगदान दिले तर रोव्हमन पॉवेल 28, शेफर्ड 28 आणि जेसॉन होल्डरने 26 धावा केल्यामुळे विंडीजने 20 षटकांत 9 गडी गमावत 205 धावा केल्या. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज 20 षटकांत 9 बाद 205 (ब्रेंडॉन किंग 18, रुदरफोर्ड 31, पॉवेल 28, होल्डर 26, शेफर्ड 28, अकील हुसेन 16, झाम्पा 3 बळी, सीन अॅबॉट, अॅरॉन हार्डी आणि बार्टलेट प्रत्येकी दोन बळी)
ऑस्ट्रेलिया 19.2 षटकांत 7 बाद 206 (मॅक्सवेल 47, इंग्लिश 51, ग्रीन नाबाद 55, हार्डी 23, ब्लेड्स 3 बळी, होल्डर, हुसेन आणि फोर्ड प्रत्येकी 1 बळी).